एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून ‘गांधी शांती यात्रे’ला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुख, मंत्री नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु झालेल्या या यात्रेचा शेवट दिल्लीतील महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे होणार आहे.
यशवंत सिन्हा म्हणाले, मोदी सरकारने आणलेला हा कायदा देशाचे विभाजन करणारा आहे. मात्र, आम्ही पुन्हा देशाचे विभाजन होऊ देणार नाही. आम्ही गांधींची पुन्हा हत्या होऊ देणार नाही. यापूर्वी आम्ही एक होतो आणि यापुढेही एक राहू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.”
१९१५ साली याच दिवशी महात्मा गांधी अफ्रिकेतून भारतात परतले आणि त्यांनी आपला स्वतंत्र लढा सुरु केला. त्यामुळेच या यात्रेची आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा आणला आहे. यातून सरकारला जे आवडत नाहीत अशा काही विशिष्ट जाती-धर्माच्या लोकांना बाजूला काढून त्यांच्या नागरिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. या लोकांना पकडून डिटेन्शन कँपमध्ये टाकायची कल्पना मोदी-शहांच्या सुपीक डोक्यातून निघाली आहे. यावेळी जेएनयू आणि जामिया विद्यापीठात झालेला प्रकार हा सरकारचा कट असल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ऐंशीव्या वर्षी यशवंत सिन्हा यांनी काढलेल्या या यात्रेचं कौतुक केलं पाहिजे. ही लढाई मोठी आहे पण सरकार सहजासहजी ऐकेलं असं मला वाटतं नाही. सरकारने ६ महिन्यांपूर्वीच डिटेन्शन कँप बांधले आहेत. हे एक प्रकारचं युद्धच असून ते शांततेनं लढावं लागेल. हा राजकीय लढा असल्याने तो राजकीय प्लॅटफॉर्मवरच लढला पाहिजे. आपण संविधानासाठी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या अजेंड्यासाठी लढत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
शरद पवार म्हणाले, आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजातील मोठ्या वर्गात नाराजी आहे. त्यांना रस्ता दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्गच योग्य आहे, ही जबाबदारी यशवंत सिन्हा यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. या नव्या कायद्यामुळे देशाच्या ऐकतेवर घाला घालण्यात आला आहे. समजातील गरीब वर्ग, अल्पसंख्यांक सांगू शकत नाहीत की ते कुठून आले आहेत, त्यामुळे त्यांची अडचण झाली आहे. समाजात जागृती करण्यासाठी एकता निर्णाण करणे गरजेचे आहे. नवी पिढी रस्त्यावर शांततेने येऊ पाहत आहे, मात्र त्यांना येऊ दिले जात नाही. जेएनयूत जे काही झालं त्याचा परिणाम आपण ठिकठिकाणी पाहत आहोत. त्यामुळेच यामध्ये जर बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला महात्मा गांधींचा मार्ग अवलंबने गरजेचे आहे.
जेएनयूत जो प्रकार झाला तो निंदणीय असल्याचे काँग्रेस नेते आशिष देशमुख यावेळी म्हणाले. त्याचबरोबर फडणवीस सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेच्या कुलगुरुंची विद्यापीठांमध्ये नियुक्ती केली आहे. त्यामुळेच जेएनयूसारखे प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. म्हणून अशा कुलगुरुंच्या नियुक्त्या रद्द करण्यात याव्यात अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे यावेळी देशमुख म्हणाले.
Post a Comment