राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी अनिवार्य करणार : अजित पवार


एएमसी मिरर वेब टीम 
बारामती : महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत मराठी विषय अनिवार्य करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार त्यांच्या मतदारसंघात (बारामती) दाखल झाले आहेत. बारामतीत त्यांचा जंगी नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारानंतर अजित पवार यांनी केलेल्या भाषणात राज्यातल्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करणार असल्याची घोषणा केली आहे.

अजित पवार म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत, मग ती कोणत्याही माध्यामाची शाळा असो, आम्ही तिथे मराठी भाषा दहावीपर्यंत कंपल्सरी (अनिवार्य) करणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीमधल्या इतर नेत्यांचाही त्याला पाठिंबा आहे.

बारामतीकरांनी मला खूप प्रेम दिलं आहे. त्यांच्या प्रेमाची परतफेड या जन्मात होऊ शकत नाही. पवार म्हणाले की, पुढील पाच वर्षात खूप काम करायचं आहे. बारामतीसह पुण्याचा पाणीप्रश्न सोडवायचा आहे. बारामतीची पाणीपुरवठा योजना 120 कोटी रुपयांची होती, ती आता 200 कोटींची करण्यात आली आहे. बारामतीच्या मेडिकल कॉलेजला 200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 100 कोटी रुपये दिले आणि त्यानंतरच मी इथे बारामतीत आलोय.

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील मदत झाली पाहिजे. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचंही काही म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आम्ही ऐकलंय. मी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील त्यामध्ये लक्ष घालतोय. नियमित कर्जफेड करणाऱ्या आणि दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील मदत केली जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post