त्यांना तलवारी नाचवायच्या, आम्हाला संविधान वाचवायचे : जितेंद्र आव्हाड


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : मी कोणाचाही मर्डर न करता लोकशाहीच्या मार्गाने चाललो आहे. मी फक्त लोकशाही मार्गाने बोलतोय. त्यांनी आयुष्यात रक्तपात केला. त्यांना लोकशाही समजणार नाही. हक्क व अधिकार समजणार नाही. त्यांची दखल घेण्याची मला गरज वाटत नाही, असा इशारा राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या आरोपावर दिला आहे.
नगर येथे सभेसाठी आले असता ते बोलत होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, उबेद शेख ,शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते आदी यावेळी उपस्थित होते. हिंदूराष्ट्र सेनेने सध्या सीएए संदर्भात होत असलेल्या सभांवर आरोप केला होता. तसेच सभा उधळून लावण्याचा इशाराही हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांनी दिला होता. त्या आरोपाला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, त्यांना तेवढेच काम आहे. हत्या करणे बॉम्बस्फोट घडविणे, तलवारी नाचवणे अशा गोष्टी जमतात. आम्ही गांधींचे वारसदार असून त्यांच्या मार्गाने चालत आहोत. त्यांच्यासारख्या गोष्टी आम्हाला जमत नाहीत, कारण आम्हाला संविधान वाचवायचे आहे. त्यांना संविधान उडवायचे आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सीएए संदर्भात आमच्या पक्षाने या अगोदरच भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज्य सरकारने या संदर्भात निर्णय काय घ्यायचा , तो मुख्यमंत्री जाहीर करतील, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post