अहमदनगर : जास्तीचे पाणी मुरतंय कुठे?


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : कॅन्टोन्मेंट म्हणते पाणी कमी मिळते. एमईएस म्हणते आम्हाला पाणी जेवढे मिळते तेवढे ते आम्हाला कमी पडते, तरीही आम्ही कॅन्टोन्मेंटला पाणी देतो. एमआयडीसी म्हणते आम्ही तर भरपूर पाणी देतो. तर मग जास्तीचे पाणी मुरतेय कुठे? असा सवाल खासदार विखे यांनी बैठकीत उपस्थित केला. भिंगारच्या पाणी प्रश्नावर आठ दिवसांनी पुन्हा बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार विखे यांनी नगरच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांसमवेत भिंगारच्या पाणी प्रश्नाबाबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. कॅन्टोन्मेंटला स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेसाठी एमआयडीसी ते एमईएसच्या मुख्य जलवाहिनीमधून टॅब टाकून द्यावा, यावा अशी मागणी खासदार विखे यांनी केली. बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर व्ही. एस. राणा यांनी वरीष्ठ कार्यालयाकडे या मागणीबाबत माहिती पाठविणार असल्याचे बैठकीत सांगितले.

एमआयडीसी, एमईएस व कॅन्टोन्मेंटच्या अधिकार्‍यांनी विविध अडचणी मांडल्या. यावर पाणी प्रश्नासंदर्भात पुन्हा आठ दिवसांनी बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. कॅन्टोन्मेंटला एमईएसने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी आवश्यक आहे. ती मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा.विखे यांनी सांगितले. तसेच कापूरवाडी तलावातील गाळ काढण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

बैठकीस कमाडंट ओ. पी. शर्मा, कॅन्टोन्मेंटचे सीईओ विद्याधर पवार, एमईएसचे गॅरिसन इंजिनिअर पारस मेस्त्री, विपिनकुमार सिंग, एमआयडीसीचे उपअभियंता एन. जी. राठोड, बोर्डाचे सदस्य प्रकाश फुलारी, रवींद्र लालबोंद्रे, संजय छजलानी, शुभांगी साठे, शिवसेना शहराध्यक्ष सुनील लालबोंद्रे, महेश नामदे, शिवाजी दहीहंडे, बाळासाहेब पतके आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post