उदयनराजेंना भाजपासमोर लोटांगणाशिवाय पर्याय नाही : नवाब मलिक


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : उदयनराजेंना भाजपासमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही, भाजपामध्ये काही मिळेल याच्यासाठी ते गेले होते. आता यापुढे काही मिळू शकेल याच्यासाठी लाचारीने ते बोलत आहेत. ते गोयल यांचा कुठेही निषेध करत नाहीत, भाजपाच्या विरोधात काही बोलत नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे. तसेच, जाणता राजा कधीच शरद पवार यांनी स्वतःला म्हटलेलं नाही, पक्षाने त्या शब्दाचा कधी वापरही केलेला नाही, लोकं त्याबाबत सांगत आहेत, असं देखील मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी पुण्यात पत्रकार परिषद घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी “जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जाणता राजा म्हणून तुलना करण्यालाही आपला विरोध आहे. कोणी त्यांना ही उपमा दिली देवास ठाऊक,” असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलाताना त्यांच्यावर अशा शब्दात टीका केली आहे.

उदयनराजे हे भाजपात गेल्यापासून त्यांच्याकडे भाजपासमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. ज्या पद्धतीने भाजपा कार्यालयात गोयल नावाच्या व्यक्तीकडून मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली, असं एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण राज्यात, देशात त्याविरोधात एक वातावरण निर्माण झालं. काल रात्री केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारपरिषद घेऊन सांगितलं की, त्या लेखकाने क्षमा मागितली आहे व पुस्तक मागे घेतलेलं आहे. मात्र, आमची माहिती आहे की, ते लेखक पुस्तक मागे घेण्यास तयार नाही, क्षमा मागत नाही. आम्ही ही मागणी करतो की, भाजपाच्या कार्यालयात पत्रकारपरिषद घेऊन गोयल आणि जावडेकर हे समोर बसलेले पाहिजे आणि ज्या गोयलने पुस्तक लिहिलेलं आहे, त्याने स्वतः क्षमा मागितली पाहिजे व पुस्तक मागे घेतो असं जाहीर केलं पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत जनता काही गप्प बसणार नाही, असं मलिक यांनी सांगितलं आहे.

लाचारीने ते बोलत आहेत
उदयनराजे भाजपामध्ये काही मिळेल याच्यासाठी गेले होते. आता यापुढे काही मिळू शकेल याच्यासाठी लाचारीने ते बोलत आहेत. ते गोयल यांचा कुठेही निषेध करत नाहीत, भाजपाच्या विरोधात काही बोलत नाहीत. म्हणजेच लाचारीमुळे ते इतरांवर बोट दाखवत आहेत, असंही मलिक यावेळी म्हणाले.

पक्षाने ‘त्या’ शब्दाचा कधी वापर केलेला नाही
शरद पवार यांनी कधीच जाणता राजा स्वतःला म्हटलेलं नाही. जाणता राजाचा अर्थ आहे की, कुठंतरी ज्याला सगळ्या विषयांची जाणीव असते. पक्षाने त्या शब्दाचा कधी वापर केलेला नाही, लोकं त्याबाबत सांगत आहेत. परंतु थेट आदित्यनाथ सांगत आहेत की, मोदी शिवाजी महाराजांसारखे आहेत. गोयल भाषणात सांगत आहेत, आता पुस्तक प्रकाशित होत आहे. याची निंदा न करता ते इतरांवर बोट दाखवत आहेत. म्हणजेच यातून स्पष्टपणे त्यांची लाचारी दिसून येत आहे. तसेच, महाशिवआघाडी असं नाव आम्ही कधी ठेवलंच नाही, महाराष्ट्रविकासआघाडी असं नाव ठेवललं आहे. जर भारतीय जनता शिवपार्टी असं नाव ठेवायचं असेल तर त्यांनी ठेवावं, असं देखील नवाब मलिक यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Post a Comment

Previous Post Next Post