'सीएए'वरुन मागे हटण्याची गरज नाही : मोहन भागवत


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : 'सीएए' अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर 'सीएए'ला होणारा विरोध हादेखील चिंतेचा विषय नसल्याचं भागवत यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा हा देशहिताचा कायदा आहे. मात्र काही लोक 'सीएए'वरुन जनतेत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा भ्रम जनतेच्या मनातून दूर केला जावा ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे असं आवाहनही मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना केलं. मुरादाबादमध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे.

'सीएए', NRC या मुद्द्यांवरुन देशातल्या काही राज्यांमध्ये गदारोळ सुरु आहे. महाराष्ट्रातही सुधारित नागरिकत्व कायदा लागू होऊ देणार नाही असं छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही 'सीएए'ला कडाडून विरोध दर्शवला आहे. या विरोधात आंदोलनंही करण्यात आली. तसंच 'सीएए'च्या समर्थनार्थही आंदोलनं करण्यात आली. याच सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. 'सीएए'मागे घेण्यात यावा हा देशहिताचा कायदा नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे. मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांनी या विरोधाची चिंता करण्याची गरज नाही असं म्हटलं आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा देशात लागू झाला आहे. उत्तर प्रदेश हे या कायद्याची अमलबजावणी करणारं पहिलं राज्य ठरलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत लोक काहीसे संभ्रमावस्थेत आहेत. हा संभ्रम त्यांच्या मनातून दूर करणं हेदेखील आपलं काम आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. मुरादाबाद येथे स्वयंसेवकांशी संवाद साधत असताना मोहन भागवत यांनी हे विधान केलं आहे. याचवेळी त्यांनी देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा अस्तित्त्वात यायला हवा असंही म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post