डोनाल्ड ट्रम्प यांच्या संकेतानंतर तेलाच्या दरात घसरण


एएमसी मिरर वेब टीम 
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषदेत इराण विरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नसल्याचे संकेत दिल्यानंतर तेलाचे दर कमी झाले आहेत. इराण बरोबर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी अमेरिका सुद्धा सकारात्मक असल्याचे संकेत ट्रम्प यांनी दिल्यानंतर तेलाच्या दरामध्ये ही घसरण झाली आहे.

इराणने इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी तळांवर मिसाइल हल्ला केल्यानंतर मोठया प्रमाणावर तणाव निर्माण झाला. दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकू शकते या धास्तीने जगभरातील शेअर बाजारात पडसाद उमटले तसेच प्रति पिंप तेलाच्या दरातही वाढ झाली. ट्रम्प यांच्या संकेतानंतर अमेरिकेतही कच्च्या तेलाचे दर चार टक्क्यांनी घटले.

इराणही एक पाऊल मागे घेतेय ही सर्व संबंधितांसाठी आणि जगासाठी एक चांगली बातमी आहे असे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर प्रति पिंप तेलाचे दर ६० डॉलरपेक्षा कमी झाले. इराणने मिसाइल हल्ला केल्यानंतर प्रतिपिंप तेलाचा दर ६५.६५ डॉलरपर्यंत पोहोचला होता. इराणचे टॉप लष्करी कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या तळावर हा मिसाइल हल्ला केला. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानीचा मृत्यू झाला होता.

Post a Comment

Previous Post Next Post