'मी योगी आदित्यनाथांच्या छातीवर बसून त्यांची हाडं मोडली असती'


एएमसी मिरर वेब टीम 
पाटना : बिहारमधील जन अधिकार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार राजेश रंजन म्हणजेच पप्पू यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर वादग्रस्त शब्दांमध्ये टीका केली आहे. “योगी आदित्यनाथ आणि मी एकाच राज्यातील असतो तर मी त्यांच्या छातीवर बसून त्यांची ३२ हाडं मोडली असती,” असे वक्तव्य यादव यांनी केलं आहे.

समस्तीपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये भाषण देताना यादव यांनी देशभरामध्ये अत्याचाराचा प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. इतकच नाही तर योगी आदित्यनाथ हे वेडे असल्याची टीकाही यादव यांनी केली.

समस्तीपूर येथे सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात संविधान वाचवा संघर्ष समितीचे आंदोलन सुरु आहे. अनिश्चित काळासाठी सुरु कऱण्यात आलेल्या या सत्याग्रह आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी यादव आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. यावेळी दिलेल्या भाषणामध्ये यादव यांनी केंद्र सरकारबरोबर विरोधीपक्षांवर टीका केली. “लोकशाहीमध्ये सत्याग्रहापेक्षा दुसरे कोणतेही आंदोलन मोठे नाही. समस्तीपूरचे जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडून सत्याग्रह आंदोलन करणाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत,” असा आरोप यादव यांनी ‘न्यूज १८’शी बोलताना केला आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ आणि जामियासारख्या शिक्षणाच्या मंदिरांमध्ये हल्ले घडवून आणले जात असल्याचा आरोपही यादव यांनी केला आहे.

देश तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातही देश तोडण्याचे काम जे लोक करत आहेत त्यांनाच देशभक्त म्हटले जात आहे, असा टोला यादव यांनी लगावला आहे. अनेक नेत्यांना वाढदिवसाचे ट्विट करायला वेळ आहे पण जेएनयूमध्ये सुरु असणाऱ्या हिंसेबद्दल ट्विट करण्यासाठी या नेत्यांकडे वेळ नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी सर्व विरोधकांचा समाचार घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post