अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता असलेल्या भागात कोसळलं प्रवासी विमान


एएमसी मिरर वेब टीम 
काबुल : तालिबानचे वर्चस्व असलेल्या अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतामध्ये सोमवारी दुपारी एक प्रवासी विमान कोसळले. गझनी प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ते अरीफ नुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजून १० मिनिटांनी हे विमान कोसळले. गझीन प्रांतातील देह याक जिल्ह्यातील सादो खेल भागात हा अपघात झाला. या विमानात नेमके किती प्रवासी होते, त्यांचे काय झाले ? याबद्दल अजून समजू शकलेले नाही.

विमान कशामुळे कोसळले ते ही अजून स्पष्ट झालेले नाही. अफगाणिस्तानातील एरियाना कंपनीच्या मालकीचे हे विमान होते. या कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर विमान कोसळल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. आमची सर्व विमाने सुस्थितीत आणि सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गझीन प्रांताच्या दोन अधिकाऱ्यांनी विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. गझनी प्रांताचा हा भाग डोंगराळ असून, हिवाळयात इथे प्रचंड थंडावा असतो. यापूर्वी २००५ साली अफगाणिस्तानात काबूलच्या दिशेने जाणारे प्रवासी विमान कोसळले होते. लँडिंगचा प्रयत्न करताना डोंगराळ भागात ही विमान दुर्घटना घडली होती. तालिबानच्या राजवटीत अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्राला मोठा फटका बसला. त्यावेळी एरियाना एअरलाइन्सला फक्त हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जाण्याची परवानगी होती.

Post a Comment

Previous Post Next Post