पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेतकऱ्यांना नववर्षाचं गिफ्ट


एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकमधील तुमकूर येथे दौरा करणार असून नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना भेट देणार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार कोटी जमा केले जाणार आहेत. जवळपास आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.

देशभरात अनेक ठिकाणी कापणीचा हंगाम सुरु होणार असून त्याआधी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार असल्याने फायदा होईल. आर्थिक वर्षातील हा तिसरा हफ्ता आहे. है पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची घोषणा करताना लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील अशी घोषणा केली होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात त्यावेळी एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास दोन हजार कोटी रुपये जमा करण्यात आले होते.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत एका शेतकरी कुटुंबाला वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत थेट खात्यात जमा केली जाते. तीन हफ्त्यांमध्ये ही रक्कम दिली जाते. प्रत्येक हफ्त्याला दोन हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्याला दिले जातात. पश्चिम बंगालमधील शेतकरी मात्र या योजनेपासून अद्याप वंचित आहेत. तेथील शेतकरी अद्यापही पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेशी जोडले गेलेले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे, लाभार्थी शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात मिळणारा हफ्ता अद्यापही मिळालेला नाही.

Post a Comment

Previous Post Next Post