पुणे : मित्राचे अपहरण करुन केला निर्घृण खून


एएमसी मिरर वेब टीम 
पुणे : महागडी कार घेण्यासाठी मित्रानेच मित्राचे ४० लाख रुपयांसाठी अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना पुणे शहरातील युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये घडली आहे. दाक्षिणात्य चित्रपट ‘खतरनाक खिलाडी २’ पाहून यातून प्रेरणा घेऊन खून केल्याची कबुली आरोपीने भोसरी पोलिसांना दिली आहे. अब्दुल अहाद तय्याब सिद्दीकी – वय- १७ रा.दापोडी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून उमर नसीर शेख वय- २१ रा.खडकी असे आरोपी मित्राचे नाव आहे. आरोपीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी उमर नसीर शेख याने ‘खतरनाक खिलाडी २’ हा चित्रपट पाहिला. यातून प्रेरणा घेऊन मित्राचे अपहरण करत ४० लाख रुपयांची खंडणी उकळायची अशी योजना आखली. त्यानुसार, रात्री साडेआठच्या सुमारास दापोडी येथील अब्दुलच्या घरी जाऊन त्याला दुचाकीवरून पुण्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे घेऊन गेला. दोघांमध्ये बिअरची पार्टी झाली. त्यानंतर मात्र आरोपी उमरने मित्राचा गळा आवळून खून केला. दरम्यान, मयत अब्दुलच्या घरच्या व्यक्तीला फोन लावून ४० लाख रुपयांची खंडणी मागितली. परंतु, मयत अब्दुलचे वडील हे भंगारचा व्यवसाय करत असल्याने त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. आरोपी उमरला कोणीतरी चुकीची माहिती दिली होती. त्यांच्याकडे खूप पैसे आहेत अस सांगण्यात आलं होतं. आरोपीला महागडी कार घ्यायची होती.

Post a Comment

Previous Post Next Post