ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनापूर्वीच साहित्य संमेलनात पायरेटेड पुस्तकांची विक्री


एएमसी मिरर वेब टीम 
उस्मानाबाद : ९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून उस्मानाबाद येथे सुरुवात होत आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे यंदाचे संमेलनही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. त्याचे कारण म्हणजे इथे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होण्यापूर्वीच काही प्रसिद्ध पुस्तकांच्या पायरेटेड प्रतींची वाढीव किंमतीत विक्री होत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

संमेलनातील खाद्य पदार्थ्यांच्या स्टॉलवर ही पायरेटेड पुस्तकं आढळून आली असून ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. हिंगलासपूरकर हे सकाळी नाश्त्यासाठी एका खाद्य पदार्थाच्या स्टॉलवर गेले असताना त्यांना बाजूलाच प्रसिद्ध पायरेटेड पुस्तकांची वाढीव किंमतीत विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र ‘आमचा बाप आणि आम्ही’ आणि किशोर शांताबाई काळे यांचं आत्मचरित्र ‘कोल्हाट्याच पोर’ या पुस्तकांच्या पायरेटेड प्रती होत्या. ही दोन्ही पुस्तक ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. त्याचबरोबर इतर अनेक लेखकांच्या पायरेटेड पुस्तकांच्या प्रतींही इथे खुलेआम विक्री सुरु होती.

यांपैकी ‘कोल्हाट्याचं पोर’ या पुस्तकाची छापील किंमत १२५ रुपये आहे तर याच पुस्तकाची पायरेटेड प्रत १५० रुपयांना विकली जात होती. तर ‘आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकाची छापील किंमत १५० रुपये असताना त्याची पायरेटेड प्रत २५० रुपयांना विकली जात असल्याचे हिंगलासपूरकर यांनी सांगितले.

हा सर्व गैरप्रकार पाहिल्यानंतर हिंगलासपूरकर म्हणाले, मराठवाड्यात लोकप्रिय पुस्तकांची पायरसी करणारे ८ विक्रेते आहेत. हे लोक अनेक जुन्या प्रसिद्ध मराठी पुस्तकांच्या पायरेटेड प्रती छापत असतात. मात्र, याचे लोण थेट साहित्य संमेलनापर्यंत पोहोचणे हे निंदणीय आहे. संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशक पुस्तकांवर सवलती जाहीर करीत असतात. त्यातच संमेलनात पायरसीद्वारे वाढीव किंमतीत पुस्तकं विकणे ही वाचकांची मोठी फसवणूक आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post