इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर करताना सावधानता बाळगा : अरुण परदेशी


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : महिला व मुलींनी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना अधिक सावधानता बाळगण्याची गरज आहे. त्याद्वारे कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संपर्क टाळावा किंवा आलेल्या अनोळखी कॉल्स अथवा मेसेजला प्रतिसाद देऊ नये आणि संभाव्य फसवणूक टाळावी, असे आवाहन नगर पोलीस दलाच्या सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी केले.

सायबर सेफ वुमेन कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी इंटरनेटद्वारे होणारी फसवणूक, त्याचे प्रकार तसेच वापर करताना घ्यावयाची दक्षता आदींबाबत पोलीस दलाच्या सायबर पोलीस ठाण्याच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगर जिल्ह्यातील मेहेकरी येथील श्री सदगुरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, सायबर क्राईम पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, सायबरतज्ज्ञ निलेश राळेभात, शाळा समिती सदस्य शिवाजीराव पालवे, माजी मुख्याध्यापक विठ्ठल बेरड, गहिनीनाथ पालवे, प्राचार्य अशोक अमृते, मीनाक्षी मोरे, रमेश चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी परदेशी यांनी, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी पसरु नयेत आणि फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येकाने दक्ष असले पाहिजे, असे सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून लैंगिक छळवणूक, आर्थिक फसवणूक असे प्रकार घडतात ते टाळण्यासाठी अनोळखी व्यक्तींशी सोशल मीडियावरुन संपर्क टाळावा, असे आवाहन केले. प्रतीक कोळी म्हणाले, आता अगदी शालेय मुलांच्या हातातही त्यांच्या पालकांनी मोबाईल दिले आहेत. त्यावरील अॅपचा वापर मुले करतात. मात्र, तंत्रज्ञान वापराची पुरेशी माहिती नसताना आणि त्यातील परिणामांची जाणीव नसताना वापर केल्याने गुन्हे घडतात. कायद्याचे उल्लंघन होते. त्यामुळे मुलामुलींनी अधिक जागरुकतेने सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सायबरतज्ज्ञ राळेभात यांनी तांत्रिक बाबींसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एटीएम कार्ड, सोशल मीडिया, ऑनलाईन विवाह नोंदणी आदी साईटसवर माहिती देताना काळजी घ्यायची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

Post a Comment

Previous Post Next Post