विद्यार्थ्यांचा राजकीय वापर होता कामा नये; शालेय शिक्षण विभागाच्या शाळांना नोटीसा


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचा राजकीय कारणासाठी वापर करण्यात येऊ नये, अशा आशयाच्या नोटीसा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून सर्व शाळांना पाठवण्यात आल्या आहेत. मुंबईतल्या एका शाळेत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ विद्यार्थ्यांकडून पोस्टकार्डवर पंतप्रधानांसाठी संदेश लिहून घेण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हे आदेश दिले आहेत.

माटुंग्यातील दयानंद बालक विद्यालय आणि दयानंद बालिका विद्यालयात सीएए समर्थनार्थ पोस्टकार्ड लिहून घेण्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर या दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण उपनिरिक्षकांनी कारणे दाखवा नोटीस पाठवून याबाबत खुलासा करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांना शालेय शिक्षण विभागाकडून नोटीसा पाठवून याद्वारे विद्यार्थ्यांचा कोणत्याही राजकीय कामासाठी वापर होता कामा नये असा आदेश देण्यात आला आहे. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान, शालेय़ शिक्षण विभागाच्या या निर्णयावर भाजपाने टीका केली असून सीएएवरुन राजकारण सुरु असल्याचा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. सीएएला डाव्या संघटना आणि विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध केला जात आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपानेही मोहिमा सुरु केल्या आहेत. भाजपाकडून शाळा, महाविद्यालये, विद्यापीठं तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांकडून सीएएच्या समर्थनार्थ संदेश लिहून घेण्याचे तसेच बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

देशभरात सीएएविरोधात प्रचंड विरोध होत असताना केंद्र सरकारने १० जानेवारीपासून देशभरात हा कायदा लागू केला आहे. तर अनेक राज्यांनी या कायद्याची अंमलबजावणी न करण्याची भुमिका घेतली आहे.

थिंक टँक स्थापन करणार
शिक्षण क्षेत्रात बदल घडवण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ‘थिंक टँक’ स्थापन करण्यात येणार असून, यामध्ये समाजातील विविध घटकांना स्थान देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात पालकांचाही समावेश करण्याचा विचार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post