शिवसेना हे नाव का वापरता? ठाकरे सेना करा : उदयनराजे भोसले


एएमसी मिरर वेब टीम
पुणे : शिवसेना नाव काढून ठाकरे सेना करा, शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं होतं का? महाशिवआघाडीतून शिव हे नाव का काढलं? अशा प्रश्नांचा भडिमार करत सातार्‍याचे माजी खासदार आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेसह राज्य सरकारवर टीकेचे बाण सोडले.

भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या ’आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरील वादावरुन पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी चहूबाजूने टीका केली. या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी पुस्तकावरील वादापेक्षा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला लक्ष्य केलं. भाजप नेते जयभगवान गोयल यांच्या ’आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन प्रचंड वाद झाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी याबाबत बोलावं अशी मागणी केली होती. यावरुन छत्रपती संभाजीराजे आणि राऊत यांच्यात वाकयुद्ध रंगलं होतं. त्यानंतर आज उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडत शिवसेनेवर टीका केली.

शिवाजी महाराजांच्या नावाचं फक्त राजकारणच सुरु आहे, असंही उदयनराजे म्हणाले. शिवसेनेवर टीका करताना उदयनराजे म्हणाले की, शिवसेनेच्या नावाला आम्ही कधी आक्षेप घेतला नाही. पण शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारलं होतं का? या पत्रकार परिषदेत मुंबईतील शिवसेना भवनचा फोटो दाखवत यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कुठे आणि शिवाजी महाराजांचा कुठे आहे? असा प्रश्न विचारला. तसंच शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेतील आमदार गजभिये मुजरा करत असतानाचा फोटो दाखवत, याचं उत्तर द्यावं लागेल असंही म्हटलं.

याशिवाय वड्याला शिववडा हे नाव देण्यावरुन, तीन शिवजयंती साजरी करण्यावरुन उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली. शिववडा हे नाव का दिलं? तीन शिवजयंती का करता? महाराजांची अजून किती मानहानी करणार असा प्रश्न त्यांनी विचारला.

महाराजांचं नाव काढलं तर त्या हिशेबाने वागा
महाराजांचं नाव काढलं तर त्या हिशेबाने वागा, नाहीतर त्यांचं नाव घेऊ नका. गलिच्छ राजकारणाचं खापर फोडायचं प्रयत्न करु नका. समज देतोय नाहीतर परिणामाला सामोरं जावंच लागेल, असा इशारा उदयनराजेंनी दिला. तसंच मी जनतेला सांगू इच्छितो शिवाजी महाराज फक्त आमच्या कुटुंबाचे नाहीत, ते तुमचेही आहेत. तुम्ही सुद्धा त्यांच्या विचारांचे वारस आहात, असंही त्यांनी सांगितलं.

’जाणता राजा’ फक्त छत्रपती शिवाजी महाराजच; पवार समर्थकांना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली आहे, या मुद्यावर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, महाराजांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का का?, असा प्रश्न अनेकदा पडतो, असंही बोलताना ते म्हणाले. काल जे पुस्तक प्रकाशित झालं, ते ऐकून अत्यंत वाईट वाटलं. नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांशी करणं अत्यंत चुकीचं आहे. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. तसेच जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तसेच आरक्षणासारखे विषय पेंडिंग का ठेवले? याचं जाणते राजे म्हणवणार्‍यांनी उत्तर द्यावे, असंही ते म्हणाले.

शरद पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत उदयनराजे म्हणाले की, ’एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. ज्यांना ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो.’ असेही ते म्हणाले.

’भोसले घराण्यात आम्ही जन्माला आलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. टिका करणार्‍यांपेक्षा आम्ही नक्कीच जास्त पुण्य केलं आहे, म्हणूनच या घराण्यात आमचा जन्म झाला आहे. तरिही मी कधीच नावाचा दुरुपयोग केला नाही. तसेच पुढे बोलताना त्यांनी थेट महाशिवआघाडीवर निशाणा साधला आहे. ’महाराजांच्या नावाचं आजपर्यंत फक्त राजकारण करण्यात आलं आहे. महाशिवआघाडीतून शिव का काढलं?’ असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post