'राजमुद्रेचा वापर टाळावा, अन्यथा शिवप्रेमींच्या असंतोषाला सामोरं जावं लागेल'


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या झेंड्यातील रंगात बदल करणार असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता यावरून नवा वाद सुरू होताना दिसत आहे. मनसेने झेंड्यावर राजमुद्रेचा वापर करू नये, असं आवाहन आर.आर.पाटील फाउंडेशनकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना करण्यात आलं आहे. या अगोदर संभाजी ब्रिगेडने देखील झेंड्यावर राजमुद्रेच्या वापर करण्याबाबत आक्षेप नोंदवलेला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती आहे. या निमित्त मुंबईत मनसेचा मेळावा होणार आहे. या दिवशी मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या झेंड्यावर मनसेकडून राजमुद्रेचा वापर केला जाणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर आर.आर.पाटील फाउंडेशनकडून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र पाठवून यासंदर्भात विनंतीवजा इशार देण्यात आल्याचे दिसत आहे. यावर राज ठाकरे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.

राजमुद्रेचं एक वैशिष्ट्य आहे, एक पावित्र्य आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली, त्यावेळी त्या संकल्पनेतुन निर्माण झालेली ही राजमुद्रा आहे. कोणतीही राजमुद्रा ही त्या राज्याच्या अधिकृतपणाची ती झालर असते. तिचा वापर कोणत्याही गोष्टीवर होणं म्हणजे हे गैरकृत्य असल्याचं आम्ही मानतो. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीचे नाहीत. परंतु, राजमुद्रेचं एक वैशिष्ट्य आहे, एक पावित्र्य आहे. ते जर असं कोणत्याही पक्षाच्या झेंड्यावर चिन्ह म्हणून जर कुणी वापरत असेल तर शिवप्रेमी म्हणून हे कदापी सहन केले जाणार नाही. यामुळे आम्ही मनसेला एक विनंती पत्र आज पाठवलं आहे. यामध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की, कृपया आपण राजमुद्रेचा वापर टाळावा, अन्यथा शिवप्रेमींच्या असंतोषाला त्यांना सामोरं जावं लागेल, अशी प्रतिक्रिया आर.आर.पाटील फाउंडेशनचे विनोद पाटील यांनी एबीपी माझाला दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post