'महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा एक नाटक होतं'


एएमसी मिरर वेब टीम 
बंगळूरु : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. गांधींजींचा स्वातंत्र्य लढा हे एक ढोंग होतं, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच अशा लोकांना भारतात महात्मा म्हणून कसं काय संबोधलं जातं? असा सवालही हेगडे यांनी केला आहे.

बंगळूरु येथे शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना हेगडे यांनी हे विधान केलं आहे. हेगडे हे उत्तर कन्नडचे खासदार आहेत. त्यांनी म्हटलं की, संपूर्ण स्वातंत्र्य चळवळ ही ब्रिटिशांच्या मदतीने चालवण्यात आली होती. या चळवळीतील नेते म्हणवणाऱ्यांना एकदाही पोलिसांची लाठी खावी लागली नाही. त्यामुळे त्यांची स्वातंत्र्य चळवळ हे एक मोठं नाटकं होतं. ब्रिटिशांची परवानगी घेऊन उभारलेलं हे एक ढोंग होतं. ही तडजोडीची स्वातंत्र्य चळवळ होती.

त्याचबरोबर महात्मा गांधी यांनी केलेली उपोषणं आणि सत्याग्रह ही देखील ढोंगं होती, देशात लोक काँग्रेसला पाठिंबा देताना सांगतात की, त्यांच्या आमरण उपोषण आणि सत्याग्रहामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र, हे खरं नाही. ब्रिटिशांनी सत्याग्रहामुळे देश सोडलेला नाही, असंही अनंतकुमार हेगडे यांनी म्हटलं आहे.

ब्रिटिश नैराश्याच्या गर्तेत अडकल्याने त्यांनी भारतावरील अंमल सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जेव्हा मी आपला स्वातंत्र्याचा इतिहास वाचतो तेव्हा माझं रक्त उसळायला लागतं. असा इतिहास सांगितल्यामुळे असे लोक देशात महात्मा बनले आहेत, अशा कटू शब्दांत खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर टीका केली.

Post a Comment

Previous Post Next Post