एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने घोषणा केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेतील शेतकऱ्यांची दुसरी यादी सहकार विभागाने शनिवारी जाहीर केली. या यादीत 21 लाख 82 हजार कर्जखात्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीतील शेतकऱ्यांना देखील लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
आत्तापर्यंत 1 लाख 42 हजार 672 शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले असून रविवारी सुट्टी असल्यामुळे सोमवारपासून त्यांच्या बँकेतील खात्यांमध्ये पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली आहे. प्रमाणीकरणानंतर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये व्यापारी बँकांसाठी 24 तासांत तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी 72 तासांमध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिली प्रायोगिक तत्त्वावरील यादी 24 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती. या यादीमध्ये 68 गावांमधील 15 हजार 358 शेतकऱ्यांचा समावेश होता. दुसऱ्या यादीनंतर राज्यात आतापर्यंत 21 लाख 82 हजार खात्यांच्या याद्या गावनिहाय जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने 13 जिल्ह्याच्या अंशत: याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत तर ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितामुळे 6 जिल्ह्यांतील याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे. त्यापैकी गावनिहाय यादी प्रसिद्ध केलेल्या खात्यांची संख्या 21 लाख 82 हजार आहे. कर्जमुक्तीसाठी 14 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याखेरीज ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे 6 जिल्ह्यातील गावांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या नसल्याचे सहकार विभागाने सांगितले आहे.
Post a Comment