अहमदनगरचा पहिला बाधित रुग्ण कोरोनामुक्त


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. या रुग्णाला आता आरोग्य यंत्रणेच्या तपासणी नंतर उद्या घरी सोडण्यात येणार आहे. त्याला घरीच आणखी १४ दिवस देखरेखीखाली ठेवणार आहे.आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचारामुळे हा रुग्ण लवकर बरा होऊ शकला, ही अतिशय दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.

जिल्ह्यात पहिल्यांदा नगर शहरातील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ पावले उचलत त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या स्त्राव नमुने चाचणीसाठी अहवालानंतर त्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे कक्षात ठेवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. दिनांक २७ मार्च रोजी १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पुण्याला पाठविला. तो अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर पुन्हा दुसरा स्त्राव चाचणीसाठी पाठविला होता.तो अहवाल आज प्राप्त झाला. हा अहवाल निगेटिव्ह आल्याने हा रुग्ण कोरोनातून बरा झाल्याचे स्पष्ट झाले.

आतापर्यंत जिल्ह्यातील २९७ व्यक्तींची तपासणी केली असून ३० व्यक्तींना आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एनआयव्हीकडे २६९जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यातील २४५ जणांचे स्त्राव नमुने निगेटिव आल्याने त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सध्या घरीच देखरेखीखाली असणाऱ्या व्यक्तींनी संख्या आता ३७४ झाली आहे, असे द्विवेदी यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post