#CORONA : घरात रहा, सुरक्षित रहा; शासनाच्या निर्देशांचे पालन करा : आमदार संग्राम जगताप


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये, त्याचा प्रादुर्भाव रोखावा, यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सुविधा नागरिकांसाठी सुरू ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. राज्य शासनाकडूनही आवश्यक त्या सर्वसुविधा पुरविल्या जात आहेत. मात्र, नागरिकांनी अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विलगीकरण हाच एक मोठा उपाय असल्याने गर्दी टाळावी. घराबाहेर पडू नका, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या व शासनाच्या आदेशाचे पालन करा, असे आवाहन अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नगरवासियांना केले आहे.
शहरात जीवनाश्यक वस्तूंची दुकाने उघडी आहेत. बंद काळात ही दुकाने सुरूच राहणार आहेत. त्यामुळे दुकानांमध्ये गर्दी करू नका. कोरोनासारख्या प्राणघातक विषाणूशी लढा देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. शासनाने जे निर्देश दिले आहेत, त्यांचे पालन करावे. नागरिकांनी घरामध्ये रहावे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. शहरातील सुविधांबाबत, अडचणींबाबत महापौर, आयुक्तांशी चर्चा केली आहे.
नागरिकांना काही अडचणी, समस्या असतील तर महापालिकेने तक्रार निवारण केंद्र सुरू केले आहे, तिथे संपर्क साधावा. शहरात औषध व धूर फवारणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाकडून फवारणी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व बंद काळात नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी घाबरू नये. मात्र, ‘कोरोना’चे गांभीर्य लक्षात घेऊन घरातच रहावे, असे आमदार जगताप यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post