# CORONA : मनपाकडून तक्रार निवारण केंद्र कार्यरत; दिवसरात्र कामकाज सुरू राहणारएएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अहमदनगर शहरातही अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद पाळण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना तक्रारींसाठी महापालिकेकडून तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. दिवसरात्र 24 तास हा कक्ष सुरू राहणार असून, त्यासाठी कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.

महापौर वाकळे व मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.24) काही वरीष्ठ अधिकार्‍यांची बैठक मनपात पार पडली. यावेळी विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, माजी नगरसेवक धनंजय जाधव, उपायुक्त प्रदीप पठारे, सुनील पवार आदी उपस्थित होते. भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी, शहरातील स्वच्छता व औषध फवारणी, मनपाच्या रात्र निवारा केंद्रात नागरिकांसाठी व्यवस्था, नागरिकांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी तक्रार निवार केंद्र आदींबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार महापालिकेने तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली आहे. तीन कर्मचार्‍यांची या केंद्रात नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला असून, आलेल्या तक्रारी संबंधित विभागाच्या प्रमुखांकडे पाठविल्या जाणार आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, यासाठी या सुविधा दिल्या जात असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील भाजी मार्केट पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. भाजी विक्रेत्यांनी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन भाजीपाल्याची विक्री करावी. शहरात घरोघरी फिरुन भाजी विक्रीसाठी मात्र मुभा देण्यात आली आहे. सुमारे 809 भाजी विक्रेते फेरीवाल्यांची मनपाकडे नोंद असून, त्यांच्यामार्फत भाजी विक्री सुरू राहणार आहे. स्वच्छतेबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच शहरात औषध व धूर फवारणी केली जाणार आहे. त्याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. संचारबंदीच्या काळात शहरात अडकलेल्या नागरिकांसाठी रात्र निवारा केंद्रात सुविधा देण्यात आली आहे. ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण हाच सर्वात मोठा उपाय असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये व स्वतःच्या आरोग्याची काळजी करावी, असे आवाहन महापौर वाकळे व आयुक्त मायकलवार यांनी केले आहे.

तक्रारींसाठी या क्रमांकावर संपर्क करा
महापालिकेने तक्रारीसाठी दोन दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. 0241-2343622 व 0241-2340522 या क्रमांकावर नागरिकांना अडचणी, समस्यांची माहिती देता येणार आहे. तक्रार निवारण कक्षात लतिका शिरसुल (सकाळी 8 ते दुपारी 4), संतोष राठोड (दुपारी 4 ते रात्री 12) व किरण उजागरे (रात्री 12 ते सकाळी 8) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post