अहमदनगर : शिवभोजनची नवीन केंद्रे सुरू


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात सुरू झालेल्या शिवभोजन योजनेच्या संदर्भात रविवारी अहमदनगर शहरामध्ये नवीन 5 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी दिली.

शिवभोजन योजने अंतर्गत नगर मध्ये दिनांक 26 जानेवारीला केंद्र सुरू झाली होती. सुरुवातीला पाच ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला मोठा असा प्रतिसाद मिळाल्यानंतर आणखी काही ठिकाणी ही योजना सुरू करावी, म्हणून मागणी प्रशासनाकडे होऊ लागली. दरम्यानच्या काळात मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भातला निर्णय घेतला होता. नव्याने काही ठिकाणी केंद्र देण्याचा निर्णय झाला होता. प्रशासनाकडे पाच ठिकाणचे प्रस्ताव दाखल झालेले होते व अन्य भागातून सुद्धा मागणी होती. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पाच केंद्रे निश्चित करण्यात आली होती. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रेव्हेन्यू कॅन्टीन, टीव्ही सेंटर येथील तिवारी भोजनालय, स्वस्तिक बसस्थानक येथील स्वामी समर्थ स्नॅक बार, चौपाटी कारंजा येथील बळीराजा भोजनालय व मंगलगेट येथील कोंडीमामा चौकात असणाऱ्या हॉटेल संस्कृती या केंद्राचा समावेश आहे.

आज प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी मित्तल यांच्या हस्ते रेव्हेन्यू कॅन्टीन येथील केंद्रावर शिवभोजन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे .आता नगर शहरामध्ये एकूण दहा केंद्र झाले असून थाळी संख्या चौदाशे झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post