अहमदनगर शहरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण; शहरात संसर्ग झाल्यामुळे प्रशासन सतर्क


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जिल्हा रुग्णालयाने सोमवारी (दि.23) तपासणीसाठी पाठविलेल्या नमुन्यांपैकी नगर शहरातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदरची व्यक्ती परदेशात प्रवास करुन आलेली नसल्याने त्याला शहरातच संसर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. दरम्यान, नगरमध्ये कोरोना बाधितांची संख्या तीनवर पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. सदर रुग्ण हा नगर शहरातील असल्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडूच नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

13 व्यक्तींचे नमुने सोमवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर व्यक्ती सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याने एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची माहिती घेतली जात आहे. त्याच्यावर उपचार केलेल्या डॉक्टर्स आणि नर्स यांना तात्काळ तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात बोलावण्यात आले आहे. संबंधित रुग्णाला तात्काळ विलगीकरण कक्षात हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 200 जणांचे स्त्राव नमुने आतापर्यंत निगेटीव्ह आले आहेत.
सदर बाधित रुग्ण हा डॉक्टर असून खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सदर व्यक्ती परदेशातून आलेला नाही. त्यामुळे तो कोरोना बाधित कशामुळे झाला, याची माहिती घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेने सुरु केले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची  तसेच त्याच्या कुटुंबियांची माहिती घेतली जात आहे.

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नका आणि सार्वजनिक संपर्क टाळा. या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी गर्दीची ठिकाणे टाळावीत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. जिल्हा प्रशासनाने आता वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. जिल्हा यंत्रणेबरोबरच महसूल, आरोग्य आणि पोलीस दलाच्या सहकार्याने ग्रामीण भागातही गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 
- राहुल द्विवेदी (जिल्हाधिकारी, अहमदनगर)

Post a Comment

Previous Post Next Post