31 मार्चपर्यंत नगर शहर लॉकडाऊन करा; महापौर वाकळे यांची जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.22) संपूर्ण देशात ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देऊन ‘कोरोना’ विरोधात सुरु केलेल्या लढ्यात सक्रिय सहभाग दिला आहे. मात्र, अद्यापही कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आणखी कठोर उपाययोजनांची गरज आहे. नगर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी आणखी कठोर पावले उचलावीत व 31 मार्चपर्यंत नगर शहर लॉकडाऊन करण्यासंदर्भात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा केली.
‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासन आवश्यक उपाययोजना करत आहेत. नगर शहर व जिल्ह्यातही प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी सकाळीच आणखी 10 रुग्ण बाधित झाल्याचे समोर आले आहे. मुंबई व पुण्यात याचे प्रमाण अधिक आहे. येत्या काळात नगर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहर लॉकडाऊन करणे आवश्यक असल्याचे मत महापौर वाकळे यांनी व्यक्त केले आहे.

‘भिकारी, बेघरांना मनपाच्या निवार्‍यात ठेवावे’
संपूर्ण शहर लॉकडाऊन केल्यास शहरातील भिकारी व बेघरांच्या निवासाचा व त्यांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे. अशा व्यक्तींना महापालिकेने उभारलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात यावे. त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यास आम्ही तयार आहोत. या शिवाय रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनाही सेवा पुरविण्याची वेळ आल्यास आम्ही सेवा पुरविण्यास तयार आहोत. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी महापालिकेकडूनही उपाययोजना केल्या जातील, असेही महापौर वाकळे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याशीही या संदर्भात चर्चा करण्यात आल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post