न्यायालयात टिकेल असे आरक्षण मुस्लिमांना देऊ : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मुस्लिमांना न्यायालयात टिकेल, असे आरक्षण देऊ, असे आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. थोरात म्हणाले, महाविकास आघाडी सरकार शेतकर्‍यांना दोन लाख रुपयांची कर्जमुक्ती देत असताना, शेतकर्‍याने आत्महत्येसारखे पाऊल का उचलले, याची सरकार म्हणून आम्हाला काळजी वाटते. पाथर्डी तालुक्यातील  शेतकर्‍याची आत्महत्या अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यावर सरकार  अभ्यास करत असल्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले.
मंत्री थोरात म्हणाले की, मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा अध्यादेश राज्यातील तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात काढण्यात आला होता. मात्र, मागील  देवेंद्र  फडणवीस सरकारने मुस्लिम आरक्षणाचा जो कायदा करायला हवा होता, तो  केला नाही. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तसाच मागे पडला आहे.  मुस्लिम समाजाला धर्म म्हणून नव्हे, तर एक गरीब कुटुंबातील घटक म्हणून आरक्षण देणे गरजेचे आहे. या गोष्टी न्यायालयाने सुद्धा मान्य केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देणार असल्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाही मदत करण्याचे काम सरकार करत आहे. त्यासाठी केंद्रानेही शेतकर्‍यांना मदत करावी, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आले आहेत. त्यांनीही शेतकर्‍यांना मदत करण्यात येईल, असे सांगितले आहे. आता दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली असून, दोन लाखांच्या पुढील कर्जमाफीचाही सरकार लवकरच विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील शेतकर्‍यांना सरसकट दोन लाखांची कर्जमाफी करताना, कुठल्याही प्रकारच्या किचकट अटी घातल्या नाहीत. या उलट, मागील फडणवीस सरकारने अनेक किचकट अटी घालून दीड लाख रुपयांची कर्जमाफी केली. मात्र, त्या कर्जमाफीचा शेतकर्‍यांना काहीह फायदा झाला नसल्याची टीका महसूलमंत्री थोरात यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post