महाविकास आघाडी सरकारची कर्जमाफी फसवी; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा आरोप


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : सरकार कुणाचेही असो, कर्जमाफी दिली तरीही शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सरसकट कर्जमाफी दिली असती, तर पाथर्डीतील या शेतकर्‍यावर आत्महत्येची वेळ आली नसती. सरकारची कर्जमाफी फसवी आहे, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

पाथर्डी येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर नगर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, श्याम पिंपळे, संभाजी दहातोंडे आदी उपस्थित होते.

प्रवीण दरेकर म्हणाले की, सरकारने कर्जमाफी जाहीर केली. मात्र, दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन त्यांनी पाळले नाही. पाथर्डीत आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या डोक्यावर दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज होते. त्यामुळे कर्जमाफीच्या यादीत त्याचे नाव येवू शकले नाही. सरसकट कर्जमाफी दिली असती. तर हा शेतकरी फासावर गेला नसता, असे ते म्हणाले. शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊनही आत्महत्या थांबल्या नाहीत, हे वास्तवर असल्याचे व सिध्द झाल्याचेही ते म्हणाले. शेतकर्‍यांना शेतीसाठी काय साधनसामुग्री देता येतील, त्यांच्या मालाला योग्य प्रकारे कसा भाव मिळेल, यासाठी आगामी काळात विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पक्षामार्फत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत देऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post