औषध फवारणी पडली महागात; माजी नगरसेवक सुवेंद्र गांधींवर गुन्हा दाखल


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महापालिकेकडून परवानगी नसतानाही शहरात परस्पर औषध फवारणी करणाऱ्या माजी नगरसेवक सुरेंद्र गांधी यांच्यासह त्यांच्या दोन सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेचे कीटक संहारक सिताराम शितोळे यांनी फिर्याद दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात औषध फवारणी करण्यासाठी राजकीय कार्यकर्ते नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. मात्र खासगी व्यक्तींकडून सुरू असलेल्या औषध फवारणीमध्ये अवाजवी व बेसुमार औषध फवारणी झाल्यास नागरिकांसाठी ती अपायकारक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य शासनाने यासंदर्भात स्पष्ट निर्णय घेऊन संबंधित महापालिका क्षेत्रामध्ये महापालिकेकडून औषध फवारणी केली जाईल, खाजगी व्यक्ती, सोसायट्यांनी परस्पर औषध फवारणी करू नये, असे आदेश दिलेले आहेत. महानगरपालिकेने ही राजकीय नेत्यांना औषध फवारणीसाठी जंतूनाशकांचा पुरवठा करण्यास नकार दिलेला आहे. खाजगी व्यक्तींना औषध फवारणी करू नये, असेही मनपा आयुक्त यांनी यापूर्वीच सांगितले आहे. असे असतानाही शहरात राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर उतरून औषध फवारणी करत असल्याने अशा व्यक्तींवर कारवाईचे आदेश मनपा आयुक्तांनी दिले होते.
त्यानुसार कीटक संहारक शितोळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरातील गंज बाजार, कापड बाजार, पारशाखुंट, जुना बाजार येथे सुवेंद्र गांधी व त्यांच्या दोन अनोळखी सहकाऱ्यांनी महापालिकेची परवानगी नसताना औषध फवारणी केली. त्यामुळे सदरचा परिसर निर्जंतूक झाल्याचा चुकीचा संदेश नागरिकांमध्ये गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार पोलिस ठाण्यात भादवि कलम 188, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post