‘त्या’ गुंडासह त्याला पाठिशी घालणार्‍याला धडा शिकवला पाहिजे : आमदार जगताप


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेचे कर्मचारी नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवित आहेत. त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. नागापूर येथे स्वच्छता निरीक्षकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामुळे कामगारांनी अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कुणा एकाच्या अथवा एका पक्षाच्या चुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय व्हायला नको. संबंधित गुंड व्यक्ती व त्याला पाठिशी घालणार्‍यांना धडा शिकवलाच पाहिजे, अशा शब्दांत आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

खासगी रुग्णायात उपचार घेत असलेल्या कर्मचार्‍याची आमदार जगताप यांनी भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर ते बोलत होते. महापालिका कर्मचारी गंभीर जखमी झाला असून, दोघांपैकी एक जण अत्यवस्थ आहे. या घटनेमुळे मनपा कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे वातारवण पसरले आहे. मात्र, कुणीही घाबरू नये. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांच्या पाठिशी आहे. संबंधित व्यक्ती गुंड प्रवृत्तीची आहे. त्याचे अवैध धंदेही त्या भागात आहेत. त्याबाबतही कायदेशीर कारवाई होईलच. मात्र या व्यक्तीला तिला पाठिशी घालणार्‍यांनाही धडा शिकविला पाहिजे. शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांकडे हा प्रकार पोहचविण्यात येणार आहे. कर्मचार्‍यांनी भयभीत न होता काम करावे. सद्यपरिस्थितीत नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळणे आवश्यक आहे. कुणा एका व्यक्ती, एका पक्षाच्या चुकीमुळे सर्वसामान्यांवर अन्याय व्हायला नको. त्यामुळे युनियनला काम बंद न करण्याबाबत विनंती केली आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post