अहमदनगर : औषध फवारणीसाठी गेलेल्या मनपाच्या स्वच्छता निरीक्षकांना मारहाण


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून शहरात औषध फवारणी सुरू आहे. बुधवारी (दि.१) रात्री उशिरा नागपूर परिसरात फवारणीचे काम सुरू असताना नगरसेविकेच्या नातेवाइकांकडून महानगरपालिकेच्या दोन स्वच्छता निरीक्षकांना मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात निलेश भाकरे व व इतर सात ते आठ जणांविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोग्य विभागातील पथकामार्फत शहर परिसरामध्ये व उपनगर परिसरामध्ये औषध फवारणीचे काम सुरू आहे. दररोज रात्री दोन-तीन वाजेपर्यंत हे काम सुरू असते. बुधवारी रात्री नागपूर गावठाण परिसरात औषध फवारणीचे काम सुरू होते. रात्री एक वाजण्याच्या सुमारास निलेश भाकरे व त्यांच्या सात ते आठ सहकाऱ्यांनी आम्ही सांगू तशीच फवारणी करायची, आम्ही सांगितले तिथेच फवारणी करायची, असे म्हणत फवारणी करणारे कर्मचारी, वाहनचालकांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे उपस्थित असलेले स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ व अविनाश हंस यांनी भाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी या दोघांनाही लाकडी दांडके व दगडाने मारहाण केली. यात दोघांच्या डोक्याला मार लागला असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
याप्रकरणी सुरेश वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश भाकरे व इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महापालिकेकडून दिवस-रात्र औषध फवारणी सुरू असताना रात्री उशिरापर्यंत कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत असताना त्यांच्यावर हल्ला होण्याचे प्रकार सुरू झाल्यामुळे कर्मचारी वर्तुळात भीतीचे वातावरण आहे.

Post a Comment

Previous Post Next Post