अहमदनगर : सथ्था कॉलनीत जाणारे रस्ते बंद; परिसर सील


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : शहरातील सथ्था कॉलनीतील एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती ‘कोरोना’ बाधीत आढळल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने हालचाली करत सदर कॉलनीत जाणारे सर्व रस्ते बॅरीकेट लावून बंद केले आहेत. या कॉलनीतील नागरिकांना बाहेर जाण्यास आणि इतर नागरिकांना कॉलनीत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केला जाणार असल्याचे आयुक्त श्रीकांत मायकलवर यांनी सांगितले.

सथ्था कॉलनीतील एका मोठ्या कुटुंबातील वृध्द महिलेला सर्दी, ताप ही लक्षणे आढळल्याने त्या महिलेस पुण्यातील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी खाजगी लॅब मध्ये त्या महिलेची ‘कोरोना’ टेस्ट केली. ती पॉझिटीव्ह आली. ही माहिती जिल्हा प्रशासनाला समजल्यावर प्रशासनाने त्या महिलेच्या घरातील १३ जणांना शुक्रवारी (दि.२९) दुपारनंतर जिल्हा रुग्णालयात नेवून त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतले होते. त्यापैकी सदर महिला व घरातील ४ पुरुष अशा एकाच कुटुंबातील ५ जणांना ‘कोरोना’ची बाधा झाल्याचे आढळून आले. सदर महिलेवर पुण्यात तर अन्य ५ जणांवर अहमदनगर शहरात विलगीकरण कक्षात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

दरम्यान, महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवालीचे पोलिस निरीक्षक विकास वाघ यांच्या समवेत सथ्था कॉलनी परिसराची पाहणी केली. हा परिसर तातडीने सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सथ्था कॉलनीत कोठी रोडच्या बाजूने येणारा रस्ता बंद करण्यात आला असून स्टेशन रोडच्या बाजूने असलेला रस्ता फक्त प्रशासकीय यंत्रणेसाठी चालू ठेवण्यात आला आहे. परिसरात औषध फवारणी व या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post