अहमदनगर : शहरातील उच्चभ्रु वसाहतीत कोरोनाची एन्ट्री; ५ व्यक्ती बाधित


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता नगर शहरात एका उच्चभ्रू वसाहतीत तब्बल ५ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि.२९) रात्री उशिरा त्यांचे अहवाल आले आहेत.
नगरच्या एका व्यक्तीवर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खासगी प्रयोग शाळेने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे महापालिकेने सथा कॉलनी येथील या व्यक्तीच्या संपर्कातील १३ जणांची नगरमध्ये तपासणी केली. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचे अहवाल प्राप्त झाले. यात १३ पैकी ५ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, पुण्यात उपचार घेत असलेली व्यक्ती व शहरातील ५ व्यक्ती असे एकूण सहा रुग्ण एकाच परिसरातील असल्याने खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे जुळ्या मुलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दि. २८ मे रोजी कोरोना बाधीत महिलेने या मुलांना जन्म  दिला होता. काल या नवजात शिशुंचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. 
दरम्यान, संगमनेर येथील दोन व्यक्तींचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post