अहमदनगर : कारवाई टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांचे दबावतंत्र; विभाग प्रमुख वखारेंचा दावा

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महापालिकेच्या मार्केट विभागाचे प्रमुख रवींद्र वखारे यांच्या विरोधात त्याच विभागातील तब्बल 10 कर्मचार्‍यांनी पैशांची मागणी केल्याची गंभीर तक्रार केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता विभाग प्रमुख वखारे यांनी आयुक्तांकडे लेखी भूमिका सादर केली आहे. या कर्मचार्‍यांनी मनपाचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. मी ते प्रकार उघडकीस आणू नये, म्हणून त्यांनी आकांडतांडव करत माझ्याविरोधात खोटी तक्रार केली आहे, असा दावाही वखारे यांनी केला आहे.
मार्केट विभागातील कर्मचारी एस. सी. करवरे, व्ही. ई. टेमक, पी. एम. पावसे, राजेंद्र रासकर, ए. आर. गुंड, व्ही. व्ही. माने, टि. जी. जगधने, एस. एस. शेख, शिवाजी गुंजाळ, एस. जी. ठुबे आदींनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन देऊन वखारे यांच्या विरोधात पैशांची मागणी करणे, मानसिक त्रास देणे आदी विविध तक्रारी केल्या आहेत. मनपा कर्मचारी व अधिकार्‍यांच्या अंतर्गत वादातून झालेल्या गंभीर आरोपांमुळे मनपा वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. त्यातच आता विभाग प्रमुखांनीही लेखी म्हणणे सादर करत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
तक्रार करणार्‍या कर्मचार्‍यांनी रस्ता बाजू शुल्क वसुली, भाडे आकारणी व वसुलीमध्ये महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा दावा वखारे यांनी केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या नोटीसा, कारवाईचे प्रस्ताव आदींची सविस्तर माहिती त्यांनी आयुक्तांना सादर केली आहे. कर्मचार्‍यांचे गैरप्रकार उघडकीस येवू नयेत, यासाठीच त्यांनी माझ्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या आहेत. मी पैशांची मागणी केली होती, तर त्यांनी माझी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे का केली नाही? असा सवालही वखारे यांनी उपस्थित केला आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या या वादातून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे मनपाची प्रतिमा मलिन होत असून, अद्यापही आयुक्तांनी याची दखल घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जीवाचे बरेवाईट झाल्यास कर्मचारीच जबाबदार
स्वतःची प्रकरणे उघडकीस येवू नयेत, म्हणून कर्मचार्‍यांनी माझ्या विरोधात खोट्या तक्रारी करुन गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे माझे मानसिक संतुलन बिघडले आहे. माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास तक्रार करणार्‍या कर्मचार्‍यांनाच जबाबदार धरावे, असेही वखारे यांनी म्हटले आहे. तसेच या कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post