अहमदनगर : मनपा विभाग प्रमुखांकडून पैशांची मागणी?एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेच्या मार्केट विभागाचे प्रमुख रवींद्र वखारे यांच्या विरोधात त्याच विभागातील तब्बल 10 कर्मचार्‍यांनी गंभीर तक्रार केली आहे. आम्ही रस्ता बाजू शुल्क वसुली करणारे कर्मचारी असून, वखारे हे आमच्याकडे वारंवार पैशांची मागणी करत असल्याचा खळबळजनक आरोप कर्मचार्‍यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. दरम्यान, कर्मचार्‍यांच्या या आरोपामुळे मनपा कर्मचारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
मार्केट विभागातील कर्मचारी एस. सी. करवरे, व्ही. ई. टेमक, पी. एम. पावसे, राजेंद्र रासकर, ए. आर. गुंड, व्ही. व्ही. माने, टि. जी. जगधने, एस. एस. शेख, शिवाजी गुंजाळ, एस. जी. ठुबे आदींनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना निवेदन दिले आहे. रवींद्र वखारे हे रस्ता बाजू शुल्क वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांना व विभागातील इतर कर्मचार्‍यांना वारंवार पैश्याची मागणी करतात. पैसे न दिल्यास कर्मचार्‍यांना शिवीगाळ करुन मानसिक त्रास देत आहेत. या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनीही वखारे यांना ताकीद दिलेली आहे. मात्र, त्यानंतरही आम्हाला त्रास देण्याचे काम सुरूच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एखाद्या कर्मचार्‍याला रजा हवी असल्यास ते ठराविक रकमेची मागणी करतात, असा आरोपही कर्मचार्‍यांनी केला आहे. रक्कम दिल्यास अर्ज स्वतःकडे ठेवून घेतात व रक्कम न दिल्यास संबंधित कर्मचार्‍यांची बिनपगारी करण्याचा प्रस्ताव देतात. याबाबत आम्ही कामगार युनियनचेही लक्ष वेधले आहे. आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी व वखारे यांची मार्केट विभागातून इतरत्र बदली करावी, अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे. तसेच त्यांची बदली करणे शक्य नसेल तर आमची इतर विभागात बदली करुन वखारे यांच्या जाचापासून आम्हाला मुक्त करावे, असे साकडेही कर्मचार्‍यांनी घातले आहे.
दरम्यान, मार्केट विभाग प्रमुख यांच्या विरोधात पैशांची मागणी केल्याचा आरोप तब्बल 10 कर्मचार्‍यांनी केल्यामुळे मनपा कर्मचार्‍यांसह अधिकारी वर्गातही मोठी खळबळ उडाली आहे. महापालिकेतील सतत चर्चेत असलेला गैरव्यवहारही या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आयुक्त मायकलवार याबाबत काय निर्णय घेतात, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार किती दिवस तुम्हाला वाचविणार?
विभाग प्रमुख वखारे यांच्या त्रासाला कंटाळून कर्मचार्‍यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे तक्रार केल्याचे निवेदनात म्हटले आहे. आमदार जगताप यांनी वखारे यांना समक्ष बोलावून ताकीद दिली. मात्र, वखारे यांनी ‘आमदार काय कायमस्वरुपी आहेत का? किती दिवस ते तुम्हाला वाचविणार? माझ्या नादी लागाल तर एकेकाला कामाला लावेल’, अशी धमकीही वखारे यांनी दिल्याचे कर्मचार्‍यांनी निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post