उतावळी नवरी, लग्नासाठी चालत केला 100 किमीचा प्रवास


एएमसी मिरर वेब टीम 
लखनऊ : लॉकडाऊनमुळे अनेक जोडप्यांची लग्न पुढे ढकलावी लागली आहेत. काही जवळ राहणाऱ्या तरुण तरुणींनी पाच पाच माणसं घेऊन लग्न केले. मात्र वेगवेगळ्या शहरात, राज्यात राहणाऱ्यांना वर वधूला त्यांची लग्न पुढे ढकलावी लागली आहेत. मात्र कानपूरमधील एका तरुणीला लग्नाची इतकी घाई लागली होती की तिने आई वडिलांना, होणाऱ्या नवरदेवाला काहीच न सांगता चक्क 100 किमीचा चालत प्रवास करत होणाऱ्या नवऱ्याचे घर गाठले.

कानपूरमधील मंगलपूर येथे राहणाऱ्या गोल्डी हिचा 4 मे रोजी कन्नौज येथील बैसापूर गावातील विरेंद्र कुमार राठोड याच्यासोबत विवाह होणार होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांचा विवाह पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर 13 मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर लग्न लावू असे ठरले मात्र केंद्र सरकारने लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला. मात्र गोल्डीला लग्नाची घाई लागली होती. त्यामुळे गोल्डी तिच्या घरातील कुणालाही न सांगता घरातून पळून गेली. त्यानंतर तिने चक्क पायी चालत 100 किमीचा प्रवास केला. गोल्डीला आलेली बघून तिचा होणारा नवरा व तिची सासरची मंडळी देखील आश्चर्यचकित झाली. त्यांनी गोल्डीच्या वडिलांना याबाबत कळवले. त्यांना देखील त्याचा धक्काच बसला कारण ते गोल्डी बेपत्ता झाली म्हणून तिची शोधाशोध करत होते. गोल्डीच्या सासरच्यांनी तिची समजूत काढायचा प्रयत्न केला. मात्र गोल्डीने कुणाचेही ऐकले नाही. अखेर गोल्डीच्या सासरच्यांनी त्यांचे रितसर विधिवत लग्न लावून दिले.

Post a Comment

Previous Post Next Post