राज्यात दिवसभरात आढळले ३ हजार रुग्ण


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत रविवारी ३ हजार रुग्णांची भर पडली. दिवसभरात ३०४१ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५०,२३१ इतकी झाली आहे. यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३३,९८८ इतकी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

राज्यातील काही भागात करोनाची परिस्थिती अजूनही नियंत्रणात आलेली नसल्याचं चित्र आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आणि रुग्णालयातून सुटी देण्यात आलेल्या रुग्णांविषयीची माहिती दररोज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ट्विटरवरून देतात. रविवारी दिवसभरात आकडेवारीत झालेल्या बदलाची माहिती आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करुन दिली.

राज्यात रविवारी ३,०४१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५० हजार २३१ इतकी झाली आहे. त्याचबरोबर दिवसभरात १,१९६ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. या रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यात १४ हजार ६०० व्यक्ती करोनातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३३,९८८ इतकी आहे. आरोग्यमंत्री टोपे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

दुसरीकडं करोनाचा उपद्रव झालेल्या धारावीत आज दिवसभरात २७ नवीन रुग्ण आढळून आले. तर दोन जणांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. धारावीतील एकून करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १५४१ झाली आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

राज्यातील रुग्णांची आकडेवारी वाढत असली, तरी त्याच्या दुपटीचा कालावधीही वाढला आहे. दरम्यान, राज्यातील सेवा आणि व्यवहार पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीनं सरकारकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्य सरकारनं विमानसेवा सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post