राज्यात चोवीस तासात ८७ पोलिसांना करोनाची लागण


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
राज्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ८७ पोलिसांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे राज्यातील करोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या १,७५८वर पोहोचली आहे. यांपैकी ६७३ पोलीस या आजारातून बरे झाले आहेत. तर १८ पोलिसांचा आजवर मृत्यू झाला आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

करोना विषाणूच्या या संकट काळात पोलीस प्रशासन हे करोनाशी मुकाबला करण्याऱ्या पहिल्या फळीत योद्धे आहेत. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन काम करताना आणि सर्वाधिक रुग्ण संख्या असणाऱ्या प्रतिबंधीत क्षेत्रातही ते आपले कर्तव्य बजावत आहेत. याचाच परिणाम म्हणून अनेकांच्या संपर्कात येत असल्याने पोलिसांनाही मोठ्या प्रणावार करोनाची लागण झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस दलात आत्तापर्यंत ११ पोलिसांचे करोनाची बाधा होऊन मृत्यू झाले आहेत. तर उर्वरित विविध जिल्ह्यांमध्ये सात पोलिसांचे करोनामुळं मृत्यू झाले आहेत. यामध्ये पुण्यात दोन, सोलापूरमध्ये दोन पोलिसांचा तर ठाण्यात एका महिला कॉन्स्टेबलचा करोनामुळं बळी गेला आहे. मुंबईत गुरुवारी शेवटचा पोलिसाचा बळी गेला. ५५ वर्षीय एका कॉन्स्टेबलला करोनाची बाधा झाली होती. त्यांची विलेपार्ले पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. या महिन्याच्या सुरुवातीला त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ९ मेपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, गुरुवारी (२१ मे) रोजी त्यांचा मृत्यू झाला.

मुंबईतील ९३ पोलीस स्टेशनपैकी जे. जे. मार्ग आणि सहार पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. यामुळे सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या मुंबई पोलिसांच्या मनोबलावरही यामुळे परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या काळात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सहार पोलीस ठाण्यात जाऊन त्यांची विचारपूस करीत त्यांचे मनोबल वाढवले होते. दगावणाऱ्या पोलिसांच्या वारसांना ५० लाखांची मदत राज्य शासनाने यापूर्वीच जाहीर केली आहे. तसेच मृत पोलिसाच्या वारसाला पोलीस दलात नोकरी देण्याची घोषणाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post