एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : सध्या महाराष्ट्रात लॉकडाउन आहे. ३१ तारखेपर्यंत हा लॉकडाउन आहे. त्यानंतर काय? असा प्रश्न सगळ्यांपुढे असेलच. लॉकडाउनचा प्रत्येकालाच कंटाळा आला आहे. मात्र एकदम लॉकडाउन करणं हे जसं चुकीचं आहे तसं तो एकदम उठवणंही चुकीचं आहे. हळूहळू सगळं सुरु करतो आहोत. मात्र गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
दुकाने, उद्योगधंदे, व्यवसाय सगळं सुरु होईल. मात्र शिस्त पाळली गेली नाही तर सगळं बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
गेल्या काही दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. मे अखेरीपर्यंत राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड लाख होईल, अशी शक्यता केंद्रीय आरोग्य पथकानं व्यक्त केली होती. पण, आता राज्यात फक्त ३३ हजार रुग्ण आहेत. राज्यातील एकूण आकडा सध्या ४७ हजार आहे, मात्र यातील १३ हजार ४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, असे ते म्हणाले.
राज्यात होळीनंतर करोनाची बोंबाबोंब सुरू झाली. त्यानंतर सगळे सण उत्सव शांततेत साजरे केले गेले. या काळात मी नियमितपणे आपल्यासमोर येतोय. राज्यातील करोना परिस्थितीविषयी माहिती देतोय. राज्यात करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था केली जात आहे. यात काही ठिकाणी रुग्णांची आबाळ होतेय, हे सत्य आहे. मात्र, रुग्णांची संख्या फार मोठी आहे. आता आपल्याकडे फिल्ड हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी लक्षणं दिसल्यास तातडीनं तपासणी करून घ्यायला हवी. जेणेकरून वेळेत उपचार करता येऊ शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Post a Comment