राज्यात शॉपिंग मॉल, हॉटेल, प्रार्थना स्थळे, शाळा, सलून बंदच राहणार


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
‘कोरोना’ रोखण्यासाठी मागच्या दोन महिन्यांपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु होता. पण केंद्र सरकारने अन लॉकडाउनच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काल मार्गदर्शकतत्वे जारी करण्यात आली. त्यानुसार ८ जूनपासून प्रार्थनास्थळे, हॉटेल, मॉल सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही आपली मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज अधिसूचना जारी केली आहे. या मार्गदर्शकतत्वानुसार राज्यात काही गोष्टी बंदच राहणार आहेत.

या सेवा बंदच राहणार
  • शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद राहणार आहे.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगीखेरीज आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास बंदच राहील.
  • मेट्र रेल्वे बंद राहील.
  • सिनेमा हॉल, जीम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरिअम, मंगलकार्याचे हॉल, बंद राहतील.
  • सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक एकत्र जमून साजरे होणाऱे कार्यक्रम बंदच राहतील.
  • धार्मिक प्रार्थना स्थळे बंद राहतील.
  • सलून, ब्युटी पार्लर, स्पा सेंटर बंदच राहतील.
  • शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट बंदच राहतील.
‘मिशन बिगीन अगेन’ : तीन टप्प्यांत सुरू करणार अनेक गोष्टी

केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतर आता संपूर्ण राज्यातही ३० जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हे करत असताना नवी सुरूवात करण्यासाठी ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरणही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. सरकारने तीन टप्प्यात निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. अधिसूचनेनुसार ३ जून, ५ जून आणि ८ जूनपासून काही गोष्टींना सुरुवात करण्यास परवानगी दिली आहे.

चौथ्या लॉकडाउनमध्ये राज्य सरकारने रेड झोन वगळता इतर ठिकाणी अनेक सेवा सुरू करण्याची परवानगी दिली होती. आता रेड झोनमध्ये येणाऱ्या महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. पण कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउनचे कडक पालन केले जाणार असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.


पहिला टप्पा 
मिशन बीगिन अगेनचा पहिला टप्पा ३ जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे ३ जूनपासून अनेक गोष्टी सुरू होणार आहेत.

सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणे यासाठी आता कोणतेही निर्बंध नसतील. बीच, सरकारी-खासगी मैदान, सोसायट्यांचे मैदान, गार्डन अशा ठिकाणी आता आरोग्याच्या दृष्टीने व्यायामासाठी सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉक यांना परवानगी असेल. पण हे केवळ सकाळी ५ ते संध्याकाळी ७ याच काळात करता येईल. समूहाने कोणतीच कृती करता येणार आहे. लहान मुलासोबल एका मोठ्या व्यक्तिला राहता येईल.

प्लंबर, इलेक्ट्रिशयन, पेस्ट-कंट्रोल आणि टेक्निशियन्स यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून कामाला सुरूवात करता येईल. मात्र त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि मास्क लावणे बंधनकारक केले आहे.

गॅरेजेस सुरू करता येतील. पण गाडी दुरूस्त करणाऱ्याला आधी त्यासाठी पूर्वसूचना द्यावी लागेल.

अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी सरकारी कार्यालये वगळून इतर सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के किंवा कमीतकमी १५ कर्मचाऱ्यांवर काम सुरू करता येईल.

दुसरा टप्पा
हा दुसरा टप्पा ५ जूनपासून सुरू होणार आहे. यामध्ये दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.

५ जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी असेल. मात्र, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल्स यांना परवानगी नसेल. परंतु यासाठी नियम असेल तो म्हणजे पी१ आणि पी२ असा. म्हणजेच रस्त्याच्या/लेनच्या किंवा पॅसेजच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी सुरू असतील तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू असतील. परंतु त्यांना केवळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ याच काळात दुकाने सुरू ठेवता येतील.

कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कारण त्यातून कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. शिवाय कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल.

लोकांनी दुकानांवर किंवा मार्केटमध्ये जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नसेल. शिवाय, यासाठी वाहनही वापरता येणार नाही.

एखाद्या मार्केटमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचा वापर केला जात नसल्याचे आढळल्यास, ते मार्केट तत्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे असतील.

टॅक्सी, कॅब आणि रिक्षा यांनाही ५ जूनपासून परवानगी असेल. मात्र त्यासाठी १+२ अशा संख्येचे बंधन असेल. म्हणजेच चालक अधिक दोन प्रवासी घेऊन आता टॅक्सी, कॅब आणि रिक्षा सुरू करता येतील. चार चाकी वाहनांसाठीही हाच नियम असेल. मात्र दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येईल.

तिसरा टप्पा
हा टप्पा ८ जूनपासून सुरू होणार आहे. त्यात खासगी कार्यालयांना काही अंशी परवानगी देण्यात आली आहे.

खासगी कार्यालयांना ८ जूनपासून कामास सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांना काम करू देण्यास परवानगी असेल. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. जे कर्मचारी ऑफिसमध्ये येतील त्यांनी सॅनेटायझेशनची सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील सध्याचे रेड झोन
मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर परिसरातील इतर महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या ही महापालिका क्षेत्रांमध्ये अनेक गोष्टी आता टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post