पियूष गोयल यांची चिडचीड होणं सहाजिक आहे : संजय राऊत


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत, हे केंद्रातल्या नेत्यांनी लक्षात ठेवण्याची गरज असून यादी कशाला मागत आहेत? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली असून याआधीदेखील अनेक गाड्या यादीशिवाय महाराष्ट्रातून सुटल्या आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र आणि केंद्र यांच्यात समन्वय महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्याचं वातावरण पाहता पियूष गोयल यांची चिडचीड होणं सहाजिक आहे. आम्हाला अपेक्षित गाड्या मिळाल्या नाहीत, त्या मिळाल्या असत्या तर स्थलांतरित मजूर लवकर घरी पोहोचले असते असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

पियूष गोयल हे राज्यसभेत महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करतात, तुम्ही देशाचे मंत्री आहात, पण या राज्याचे प्रतिनिधीत्व करता. महाराष्ट्राचे आणि मुंबईचे प्रश्न वेगळे आहेत हे केंद्रातील प्रत्येक नेत्याने समजून घ्यावे. यादीचं म्हणत असाल तर सरकारने न मागताही यादीशिवायही महाराष्ट्रात नागपूर, पुण्यातून गाड्या सुटल्या आहेत. त्याची यादी आमच्याकडे आहे. उगाच यादी कशाला मागता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र हे विरोधकांचं राज्य आहे हे जर डोक्यातून काढलं तर यादीची गरज पडणार नाही, महाराष्ट्राचं नेतृत्व करणारेच केंद्रातले नेते याद्या मागत आहेत. फक्त महाराष्ट्राकडेच यादी मागितली जात असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्राचे केंद्रातील मंत्री असं वागतात याचं आश्चर्य आणि खेद आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post