फडणवीस खोटं बोलत आहेत : वडेट्टीवार


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : करोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा धादांत खोटा आहे. केंद्राने एक नवा पैसा दिला नसून फडणवीस खोटे बोलून राज्यातील जनतेची दिशाभूल करित आहेत. दरवर्षी प्रमाणे केंद्राचा राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठीचा १७१८.४० कोटीचा निधी आला आहे. त्यातील ३५ टक्के निधी करोनासाठी खर्च करता येवू शकतो इतकेच काय ते केंद्राने केल्याची टिका आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

नियोजन भवन येथे पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्यावर सडकून टिका केली. फडणवीस खोटं बोला, नेटाने बोला या युक्तीचा अवलंब करित आहेत. केंद्राने दरवर्षी प्रमाणे राज्य आपत्ती व्यवस्थापनासाठी २०२०-२१ साठी ४२९६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील ४० टक्के निधी म्हणजे १७१८.४० कोटींचा निधी हा राज्य आपत्ती व्यवस्थापन व रिसपॉन्ससाठी आहे. त्यानुसार सरकार राज्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी हा निधी खर्च करतो. या निधीत ७५ टक्के निधी हा केंद्र सरकारचा आहे. या निधीतून पहिला हप्ता १६११ कोटी इतका निधी राज्य सरकारला मिळाला आहे. त्यातील २०२०-२१ यावर्षी ३५ टक्के निधी म्हणजेच ६०१ कोटी इतका निधी कोव्हीड करोनासाठी खर्च करण्याची परवानगी केंद्राने दिली आहे.

राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर ही परवानगी मिळाली आहे. यातून कोव्हीडसाठी राज्य सरकारने आतापर्यंत १७१ कोटीचा निधी वितरीत केला आहे. तर १५६ कोटींचा निधी मंजूर करण्यास राज्य कार्यकारी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. येत्या एक दोन दिवसात हा निधी दिला जाईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले. कोव्हीडसाठी आतापर्यंत एकूण ३२७ कोटी मंजूर केले आहेत. केंद्र सरकारने कोव्हीडसाठी स्वतंत्र असा कुठलाही निधी दिला नाही. विरोधी पक्ष नेते फडणवीस खोट बोलून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post