चांदबीबी महालाच्या परिसरात रविवारी सकाळी बिबट्याचे दर्शन


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शहरापासून जवळच असलेल्या चांदबीबी महालावर नागरिक दररोज किंवा सुटीच्या दिवशी  फिरण्यासाठी मोठी गर्दी करतात. हा भाग निसर्गाने नटलेला असून हे पर्यटकांचे विशेष आकर्षण स्थळ आहे. येथे असलेल्या दाट झाडीमुळे या ठिकाणी अनेक वन्य प्राण्यांचे अस्तित्व देखील आहे. मात्र या भागात आता बिबट्याच्याा अस्तित्व आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
रविवारी (दि.७) सकाळी नगर मधील अभिजित पाडळकर, पराग गावडे, प्रवीण राठोड व अन्य मित्र रविवारची सुटी असल्याने या भागात फिरायला गेले होते. महालाच्या अलिकडे त्यांना रस्त्यापासून जवळच मोरांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे रस्ता सोडून ते डोंगर उतारावर उतरले. रस्त्यापासून अवघ्या दोनशे फुटांवर ते मोरांच्या जवळ पोहोचले असतानाच बाजूच्या करवंदाच्या जाळीत मोरांच्या शिकारीसाठी बिबट्या दबा धरून बसलेला होता. हे तीन चार जण जवळ पोहोचल्याचे पाहून त्याने डरकाळी फोडत त्यांच्या विरुद्ध दिशेला उडी मारली. अचानक बिबट्या समोर दिसल्याने या युवकांनी घाबरून तेथून पळ काढला व त्याबाबत लगेच निसर्गमित्र व जिल्ह्याचे व्याघ्र संरक्षण समिती सदस्य मंदार साबळे यांना कळवले. यावेळी त्यांचे मोबाईल रेकॉर्डिंग सुरू असल्याने त्यात डरकाळीचा आवाज रेकॉर्ड झाला. साबळे यांनीही तातडीने या ठिकाणी जात हा परिसर पिंजून काढला.
या भागात त्यांना डोंगर उतारावर काही भागात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. ठसे पाहता हा मध्यम वयाचा बिबट्या असून गेल्या आठ दहा दिवसंपासून त्याचे या भागात वास्तव्य असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या भागात बिबट्याला लपण्यासाठी चांगली झाडी आहे. साबळे यांनी तातडीने या बाबत जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी व वनपरिक्षेत्र अधिकारी एन. बी. पोकळे यांना याची माहिती दिली. तसेच या भागात नियुक्त कर्मचाऱ्यांना या ठिकाणी गस्त वाढवून नागरिकांच्या फिरण्यावर लक्ष ठेवण्याविषयी सूचना दिल्या. नागरिकांनी महालाच्या परिसरात फिरताना मुख्य रस्ता सोडून कुठल्याही आडवाटेने महालावर अथवा करवंद तोडण्यासाठी जाऊ नये. तसेच गुरे घेऊन डोंगर उतारावर जाऊ नये, असे आवाहन साबळे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post