'माऊली'ने फोडली अभागीवरील अत्याचाराला वाचा


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मनोविकलांगतेचा गैरफायदा घेऊन युवतीवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला पकडण्यात नगरच्या माऊली सेवा प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. सुचेता व डॉ. राजेंद्र धामणे या दाम्पत्याला यश आले आहे. मनोविकलांग अवस्थेत विकृतांच्या वासनांना बळी पडलेल्या व त्यामुळे गर्भवती झालेल्या २९ महिलांची प्रसुती माऊली सेवा प्रतिष्ठानने आतापर्यंत केली आहे. या २९ बालकांसह मनोविकलांगतेतून बऱ्या झालेल्या तसेच मानसिक अस्वस्थतेने वैद्यकीय उपचार घेत असलेल्या मिळून ३०० महिलांचा सांभाळ डॉ. धामणे दाम्पत्य नगर-मनमाड महामार्गावरील व नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील मनगाव प्रकल्पात करतात. पण मनोविकलांग महिलांवर अत्याचार करून त्यांच्यावर गार्भारपणे लादणारांचा शोध त्यांना कधी लागला नव्हता. पण दोन दिवसांपूर्वी उघड झालेल्या एका घटनेत युवतीच्या मानसिक असंतुलनाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार करणारा व तिच्यावर गर्भारपण लादणाऱ्या अभय कडू (वय ५८, रा. पुणे) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याची कामगिरी डॉ. धामणे दाम्पत्याने केली आहे.

या घटनेची माहिती अशी की, सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास स्टेशन रस्त्यावरील चांदणी चौकात युवती निर्वस्त्र अवस्थेत आरडाओरड करीत असल्याची माहिती मिळाल्यावर डॉ. धामणे दाम्पत्य तेथे गेले व त्या युवतीला मनगाव प्रकल्पात आणून तिच्यावर त्यांनी उपचार सुरू केले.  तिला थोडे बरे वाटू लागल्यावर तिने तिच्यावर गुदरलेल्या भयानक प्रसंगाची माहिती दिली. अभय कडू नावाच्या माणसाने सोमवारी पहाटे पुणे रस्त्यावरील कायनेटिक चौकाजवळच्या रेल्वे पुलाजवळ मोटार गाडीत तिच्यावर अत्याचार केल्याचे तसेच मागील काही दिवसांपासून त्यानेच पुण्यात तिच्यावर असे अत्याचार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतरच्या तिच्या वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यावर डॉ. धामणे दाम्पत्याने पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांची भेट घेऊन त्यांना त्याची माहिती दिली. त्यांनी पोलिस अधीक्षकांकडे त्यांना नेऊन माहिती दिल्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश झाला व त्यानुसार पोलिसांनी अभय कडूविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले गेले.

बोलण्यातील तफावतीने संशय बळावला
सोमवारी पहाटे अत्याचाराला बळी पडलेली संबंधित युवती कडूच्या तावडीतून निसटली. निर्वस्त्र अवस्थेतच ती पहाटेच्या सुमारास स्टेशन रस्त्यावरील चांदणी चौकापर्यंत पळत गेली, तेथे ती आरडाओरड करीत होती. त्या परिसरात राहणाऱ्या एका महिलेने सकाळी १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे निर्भया पथक तेथे आले, तोपर्यंत डॉ. धामणे यांनाही माहिती मिळाल्याने तेही अॅम्बुलन्स घेऊन तेथे आले होते. तिकडे युवती हातून निसटल्याने कडूने पोलिसांना कळवून ती बेपत्ता असल्याचे सांगितले होते, त्यावरून पोलिसांकडे मिसिंग नोंद होती. त्या युवतीला मनगावमध्ये नेल्याचे समजल्यावर कडू तेथे जाऊन धडकला. ५८ वर्षाच्या या व्यक्तीकडे पाहून डॉ. धामणेंना त्याच्या विकृततेबद्दल आधी संशय आला नाही, त्याचवेळी त्या युवतीवर उपचार सुरू असल्याने तिची मनःस्थितीही ठीक नव्हती. यावेळी बोलताना कडूने संबंधित मुलगी आपल्या मित्राची असून, तिचा आपण सांभाळ करीत असल्याचे डॉ. धामणेंना सांगितले. पण त्या मित्राचे नाव त्याला काही सांगता आले नाही. त्यामुळे डॉ. धामणेंचा संशय बळावला. तसेच त्याच्या बोलण्यात विसंगतीही दिसत होती. कधी त्या मुलीला औरंगाबादवरून आणल्याचे तर कधी मित्राची मुलगी असल्याचे तो सांगत होता. या दरम्यान संबंधित मुलगी शुद्धीवर येऊन तिने कडूने केलेल्या अत्याचाराची माहिती दिल्यावर मग यातील गांभीर्य पाहून डॉ. धामणेंनी तातडीने हालचाली केल्या व पोलिसांना माहिती दिली. संबंधित तरुणी मनोविकलांग अवस्थेत औरंगाबादला फिरत असताना सुमारे महिनाभरापूर्वी- तुला तुझ्या घरी पोहोचवतो, असे सांगून कडूने तिला पुण्याला नेले होते व तिच्यावर अत्याचार केले होते. त्यानंतर सोमवारी मध्यरात्री तोच तिला गाडीतून पुण्याहून घेऊन आला होता. नगरजवळ तिच्यावर अत्याचार केल्यावर ती निसटल्याने व तिने आपल्यावर गुदरलेल्या भयानक अवस्थेची माहिती डॉ. धामणेंना दिल्याने विकृत कडूला पोलिसांनी ताब्यात देऊन त्याच्याविरुद्ध डॉ. सुचेता धामणे यांनीच फिर्याद दिली व त्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला. दरम्यान, संबंधित युवतीची प्रकृती सुधारत आहे, गर्भवती असल्याने त्यासह मानसिक अस्वस्थतेमुळे तिच्यावर मनगावमध्येच उपचार सुरू आहेत व तिची प्रकृती सुधारत असल्याचे डॉ. धामणे यांनी सांगितले.
---

Post a Comment

Previous Post Next Post