एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शेण, गोमूत्र, कापूर, कडुनिंब, गुगुळ व तुप असे विविध घटक वापरून फॅन्सी राख्या नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील श्रीमाऊली स्वदेशी गोपालन संस्थेने यंदा प्रथमच केल्या आहेत. ही पर्यावरणपूरक व आरोग्यवर्धक पंचगव्य फॅन्सी राखी हातावर बांधल्यावर शारीरिक तापमान समप्रमाणात राहील, असा विश्वास गोपालन संस्थेचे प्रमुख हभप माऊली शिर्के यांनी व्यक्त केला आहे.
येत्या ३ ऑगस्टला राखी पौर्णिमा असून, यानिमित्त लाडक्या भावाला बहिणीकडून राखी बांधली जाणार आहे. बाहेरगावी असलेल्या भावासाठी पोस्टाद्वारे राखी पाठवण्याची लगबग महिलांची सुरू आहे. त्यासाठी कोरोनाच्या काळात आरोग्य वर्धक राखी नगरमध्ये तयार झाली आहे. या पंचगव्ययुक्त राखीची किंमत पाच रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र, या समवेत २० रुपये गोसेवेसाठी घेतले जाणार आहे. त्यामुळे ही एक राखी २५ रुपयांना मिळणार आहे. सध्या गोशाळा चालविणे म्हणजे वादळात दिवा तेवत ठेवण्याचे दिव्य असल्याचे सांगून माऊली शिर्के म्हणाले, गोशाळेला पशुखाद्य, गायींसाठी औषधे, गायींच्या आरोग्य तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांची फी आदी खर्च असतो. गायींना पाजण्यासाठी टँकरने पाणी घ्यावे लागते. रोज हिरव्या चाऱ्याची आवश्यकता असते. असा महिन्याचा हजारो रुपयांचा खर्च लागतो. उत्पन्न कमी व खर्च जास्त आहे. मात्र, गोवंश जगले पाहिजे व गोमाता पूजनीय असल्याने त्रास सहन करून विविध मार्गाने दानशुरांच्या मदतीने पैसा गोळा करून गोशाळा चालवली जाते. त्याचाच एक भाग म्हणून आरोग्यदायी पंचगव्य राखीची निर्मिती केली आहे. ५ रुपये प्रती राखीची किंमत व २० रुपये गोसेवा मूल्य असे एकुण २५ रुपयाला राखी मिळणार आहे. जास्तीतजास्त राख्या घेऊन गोशाळेस आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन माऊली शिर्के यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक-९८९०७९८२८९ व ८६०५०९१२७५. आजपर्यंत गोसेवकांच्या सहकार्याने व विश्वासाने सुरू असलेल्या श्री माऊली स्वदेशी गोपालन संस्थेला स्वावलंबी होण्यासाठी मदतीची गरज आहे, असेही शिर्के यांनी सांगितले.
Post a Comment