'त्यांचे' कामापेक्षा दामाला महत्त्व; कळमकरांचे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला प्रत्युत्तर


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
आताच्या लोकप्रतिनिधींनी (आ. संग्राम जगताप) तपोवन रस्त्याचे काम सुरू असताना वेळोवेळी पाहणीही केल्याचे वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. त्यावेळी त्यांना रस्त्याचे काम दर्जेदार नसल्याचे दिसले नाही का? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे, असे म्हणणे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी मांडले आहे. त्यांच्यासाठी कामापेक्षाही दाम किती मिळणार हे महत्त्वाचे असल्याने त्यांनी निकृष्ट कामाकडे डोळेझाक करून ठेकेदाराला अभय दिले असावे, असा दावाही कळमकर यांनी केला. लाईट घोटाळ्यात लोटकेचा लोटा कोणाच्या हातात राहिला हे नगरकरांनी बघितले आहे, त्यामुळे नगरकरांचे तपोवन रस्त्याबाबत समाधान होईपर्यंत या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा करू नये अशीच शिवसेनेची भूमिका राहील, असेही कळमकर यांनी स्पष्ट केले आहे.

सावेडीतील तपोवन रस्त्यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडत आहे. गुरुवारी राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांच्यासह काही नगरसेवकांनी सेनेचे माजी आमदार अनिल राठोड व माजी महापौर कळमकर यांच्यावर टीका केली होती. त्याला कळमकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे व विरोधकांकडून कामापेक्षा दामाला जास्त महत्त्व दिले जात असल्याचा दावाही केला आहे. ते म्हणाले, शिवसेना उपनेते राठोड यांच्या २५ वर्षाच्या आमदारकीचा हिशोब विरोधक मागत असतात. परंतु विद्यमान आमदारांची (आ. संग्राम जगताप) पाच वर्षाची वैयक्तिक प्रगती पाहता त्यांना संपत्तीची अदलाबदल करण्याचे आव्हान यापूर्वीच राठोड यांनी दिलेले आहे. मात्र ते स्वीकारले जात नाही. विरोधकांना फक्त ठेकेदाराकडून मिळणार्‍या मलिद्याचीच चिंता असते. तपोवन, बोल्हेगाव रस्त्याच्या कामाबाबत शिवसेनेने सर्वप्रथम आवाज उठवून राज्य सरकारकडे तक्रार केली. त्यामुळे सरकारने तातडीने चौकशी समिती नेमली. यादरम्यान ठेकेदाराचे बिलही थांबवण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून त्यांनी सेनेवर चुकीचे आरोप करून थयथयाट चालवला आहे. मोठा गाजावाजा करून रस्त्याचे उद्घाटन, कामाच्या पाहणीचा फार्स करणारांनी त्याचवेळी आवाज उठवला असता तर आज रस्ता दर्जेदार झाला असता. परंतु, त्यांच्या दृष्टीला स्वत:च्या वैयक्तिक फायद्यापलीकडे काहीच दिसत नाही. त्यांचे हे पितळ अवघ्या काही दिवसांतच उघडे पडल्याने आता शिवसेनेवर केविलवाणे आरोप केले जात आहेत, असा दावा कळमकर यांनी केला. 

तपोवन व बोल्हेगाव रस्त्याचे काम पुन्हा सुरू होवून ते दर्जेदार होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कोणाला आपल्या वॉर्डात इतरांनी येवून आपले गैरप्रकार उघडे करू नये, असे वाटत असले तरी आमच्यासाठी जनतेचे हित महत्त्वाचे असल्याने शिवसेना नेहमीच याहीपेक्षा मोठा आवाज उठवत राहील, असेही कळमकर यांनी स्पष्ट केले. जनतेच्या पैशाचा असा अपव्यय होत असल्याचे पाहून शिवसेनेने सर्वप्रथम रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी करून नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवली. आता चौकशी सुरू झाल्याने आपले नसते उद्योग बाहेर येण्याच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा दावाही कळमकर यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post