एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नगरमधील हरहुन्नरी कलावंत हेमंत दंडवते अयोध्येतील राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी ग्लास म्युरलमध्ये (द्वि-मितीय) प्रभु श्रीराम यांची छबी साकारत आहेत. यात काचेच्या आरशाच्या तुकड्यांपासून (बिव्हेल पिसेस) श्रीराम प्रतिमा साकारली जात आहे. ती अयोध्येला पाठवण्याचे त्यांचे ध्येय आहे.
काच कलाक्षेत्रात स्टेन ग्लास, एअर ब्रशिंग, इचिंग,एनग्रेव्हिंग,ॲसिड टेक्शचर इत्यादी अवघड काच कलाकृती दंडवते साकारतात. इतर माध्यमापेक्षा ही कला किचकट,आव्हानात्मक आहे. ती साकारताना हाताला काचेने कापणे, इजा होणे, विविध टेक्श्चरसाठी काचेवर रासायनिक प्रक्रियेने हात भाजणे, काच नाजूक असल्याने हाताळताना कलाकृतीची तुटफुट होणे अशा अडचणींना तोंड द्यावे लागते. शिवाय या कलेत पूर्ण आकाराचे ग्लास म्युरल व्यक्तीचित्र साकारणे आव्हानात्मक व अवघड आहे. अशा स्थितीत दंडवते यांनी अभ्यास करून आराखडा, चित्र रेखाटन, फार्मा कटिंग, आरसा तुकडा कटिंग, चॅम्फर पॉलिश, अॅसिड टेक्शचर, अल्ट्रा व्हायलेट लाईट विशिष्ट ग़्ल्यु द्वारे पेस्टिंग केले आहे. हे काच म्युरल काम करताना खूपच विलक्षण अनुभव येत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
प्रभु श्रीरामचंद्राच्या चेहऱ्यावरील भाव प्रसन्न व विलोभनीय आहे, महिरप व स्तंभ यांनी म्युरल अधिक सुंदर झाले आहे. हे दुर्मिळ काच म्युरल निश्चितच अयोध्या मंदिराची शोभा वाढवेल, असा विश्वास त्यांना आहे. श्रीरामाचे हे काच म्युरल १० फुट उंच व ८ फुट रुंद असेल, त्यावर प्रकाश प्रभाव टाकून सजावट केली जाणार आहे.
Post a Comment