काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या संस्थेचा उपक्रम भाजप खासदार करणार सुरू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये कार्यरत असलेल्या विकासवर्धिनी या प्रशिक्षण, लोकशिक्षण व जनजागृतीसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या सामाजिक उपक्रमाचे पहिले पुष्प चक्क भाजपचे नगरचे खासदार डॉ. सुजय विखे गुंफणार आहेत. देशमुख यांच्या विकासवर्धिनी संस्थेद्वारे नगर शहरात "कोरोनामुक्त नगर अभियान" हाती घेण्यात आले असून या अभियानांतर्गत "नगरकरांशी मान्यवरांचा संवाद" हा उपक्रम होणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खा.डॉ. सुजय विखे हे या अभियानाच्या पहिल्या सत्रात सहभागी होणार आहेत.

रविवारी (२ ऑगस्ट२०२०)दुपारी ४ वाजता नगरकरांशी ते फेसबुकवर ऑनलाइन संवाद साधणार आहेत. काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या संस्थेचा उपक्रम भाजप खासदाराच्या उपस्थितीत सुरू होतो, हा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय झाला आहे. अर्थात देशमुख व विखे यांचे जुने सलोख्याचे संबंध आहेत. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या काळात खा. डॉ. विखे आक्रमक भूमिकेत असून, नगर शहरात किमान ५ दिवस कडक कर्फ्यू लावण्याची त्यांची आग्रही मागणी आहे. मात्र, महाविकास आघाडीचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ती फेटाळून लावली आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्या विकास वर्धिनी संस्थेच्या नगरकरांशी संवाद उपक्रमात डॉ. विखे नगर शहरातील कोरोनाची स्थिती, सध्या सुरू असलेल्या उपाययोजना, प्रस्तावित उपाययोजना, नागरिकांची व प्रशासनाची जबाबदारी आदी मुद्यांवर मते व्यक्त करणार आहेत. यानिमित्ताने त्यांच्याकडून नगर शहरातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका झाली तर ती अप्रत्यक्षपणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर असणार आहे. अशा स्थितीत काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या संस्थेच्या व्यासपीठावरून महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान करण्याची संधी डॉ. विखे साधतात की देशमुख-विखे सलोख्याच्या संबंधांना जागून स्वतःची पक्षीय राजकीय भूमिका बाजूला ठेवून वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे कोरोनापासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शक करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्तेचे घटक असलेले जिल्ह्यात बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरे हे तीन मंत्री तसेच डॉ. सुधीर तांबे, अरुण जगताप या ज्येष्ठांसह संग्राम जगताप, निलेश लंके, किरण लहामटे, रोहित पवार, आशुतोष काळे, लहु कानडे असे ८ आमदार असताना भाजपचे खासदार डॉ. विखे यांच्या हस्ते सामाजिक उपक्रमाचे पहिले पुष्प गुंफणे राजकीय चर्चेचा विषय झाले आहे. तर दुसरीकडे डॉ. विखे यांनीही ज्येष्ठ नेते शरद पवार व बाळासाहेब थोरात यांच्याशी असलेल्या संघर्षाला पूर्णविराम देण्याचे सुतोवाच केले आहे. या संघर्षातून अनेकांच्या घराच्या चुली पेटल्याचा त्यांचा दावा आहे व या चुली आता विझवायची तयारी त्यांनी सुरू केल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या संस्थेच्या सामाजिक अभियानाची सुरुवात करण्याची त्यांना मिळालेली संधी, ही भविष्यातील जिल्ह्याच्या बदलत्या राजकीय समीकरणाची सुरुवात तर नाही ना, याचीही चर्चा झडू लागली आहे.

दरम्यान, नगर शहरातील कोरोनाचा वेगाने वाढणारा संसर्ग लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जनतेचा सहभाग गरजेचा असल्याने विकास वर्धिनी संस्थेने कोरोनामुक्त अभियान हाती घेतले आहे. मान्यवर नगरकर यात नगरकरांशी संवाद साधणार आहेत. रविवारी (२ ऑगस्ट) दुपारी ४ वाजता खा. डॉ. विखे यांच्या फेसबुक ऑनलाइन संवादात सहभागी होऊ इच्छिणारांनी ९४२२२२२६९५ या दूरध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post