महाविकास आघाडीतील काही पक्षांकडून घोडेबाजार; भाजपचा दावा


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचांचीच नेमणूक करावी व सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही राजकीय पक्षाकडून होणारा या प्रशासक नियुक्तीतील घोडेबाजार थांबवावा, अशी मागणी जिल्हा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस यांचा समावेश आहे. मात्र, प्रा. बेरड यांनी या आघाडीतील काही पक्षांकडून घोडेबाजार सुरू असल्याचा दावा केल्याने त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीला टीकेचे लक्ष्य केल्याचे दिसत आहे.

बेरड यांनी ठाकरे यांना पत्र पाठवून महाराष्ट्रामध्ये मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंच यांचीच नेमणूक करावी. देशात वा राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना काळजीवाहू म्हणून काम पाहण्यास सांगितले जाते, त्याप्रमाणे ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमताना निर्णय घ्यावा व विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्ती दिली जावी, असे बेरड यांनी सुचवले आहे. कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक गावाने विद्यमान सरपंचांच्याच नेतृत्वाखाली यशस्वी लढा दिला आहे, त्याचबरोबर अनेक विकास कामे गावा-गावांतून सुरू आहेत जर सत्ताधारी महाविकास आघाडीतील काही पक्षांकडून घोडेबाजाराच्या आधारावर प्रशासक नेमणुका जर झाल्या तर विकास कामांना खीळ बसेल व गावाची राजकीय-सामाजिक घडी विस्कटेल. त्यामुळे गावातील वातावरण कलुषित होईल, असा दावाही प्रा. बेरड यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post