कोरोना लुटालुटीचे होणार ऑडिट; पालकमंत्र्यांनी दिले आदेश


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जिल्ह्यात कोरोना रुग्णांकडून काही खासगी रुग्णालये अवाजवी बील आकारत असल्याच्या तक्रारींची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. अशा अवाजवी शुल्क आकारणार्‍या खासगी रुग्णालयांचे ऑ़़डिट केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, खासगी रुग्णालयांकडून होत असलेल्या लुटालुटीच्या तक्रारी कोठे कराव्यात याचे स्पष्टीकरण त्यांनी केलेले नाही. अर्थात, जिल्हा प्रशासनाकडे अशा तक्रारी केल्या गेल्या तरी त्यांची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले आली वा खासगी रुग्णालयांनी लुटालूट केल्याबाबत व्हॉटसअॅप व फेसबुकसारख्या सोशल मिडियातून भाष्य करणारांनी अशा लुटालुटीच्या पुराव्यानिशी तक्रारी केल्या तरच या लुटालुटीला चाप बसू शकणार आहे.

मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात व शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने पूर्ण संचारबंदी व लॉकडाउन करण्याची मागणी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे व शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेकांनी केली आहे. मात्र, त्यास पालकमंत्री मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. बहुदा श्रावणानंतर सुरू होणाऱ्या सणावारांच्या काळात सारेच बंद राहिले तर जनतेची अडचण होऊ शकते, त्यामुळे पूर्ण लॉकडाऊनला त्यांनी मान्यता दिली नसावी. मात्र, विनामास्क फिरणार्‍यावर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत. त्यामुळे यापुढे मनपा व जिल्हा प्रशासनाकडून विना मास्क फिरणारांवर तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणारांविरुद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग रोखावयाचा असेल तर सर्व नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सध्या जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोना बाधित २ हजार ७७५ रुग्ण आहेत. त्यापैकी १ हजार ४३६ जण कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत. याशिवाय, बाधित रुग्णांना ज्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे, तेथे त्यांना चांगल्या सुविधा पुरविण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी केल्या. नागरिक, जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य, महापालिका आणि जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या परिस्थितीला सर्वांनी एकजुटीने तोंड दिले पाहिजे, असे आवाहन करून ते म्हणाले, रुग्णांची संभाव्य वाढती संख्या लक्षात घेऊन रुग्णालयांतील बेड्सची संख्या, ऑक्सिजन सिलेंडरची उपलब्धतेचाही आढावा घेतला असून पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. 

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, खासदार डॉ. सुजय विखे, पारनेरचे आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे उपस्थित होते.

जिल्ह्यात सुरुवातीच्या दोन-तीन महिन्यात कोरोना विषाणू संसर्ग आटोक्यात होता. त्यानंतर नागरिकांची बाहेरगावाहून ये-जा वाढल्याने संसर्गाचे प्रमाण वाढले. ते रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चाचण्यांची संख्याही वाढविली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढताना दिसत असली तरी आरोग्य यंत्रणा पूर्ण दक्ष आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये रोज ३०० चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या येत्या दोन दिवसांनंतर प्रतिदिन एक हजार अशी होणार असल्याने बाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वेगाने करणे शक्य होईल आणि संसर्गाची साखळी तोडण्यात यश येईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. आगामी काळात कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी आरोग्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणार्‍या आणि स्वतःबरोबरच इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचविणार्‍यांवर कडक कारवाई करावी तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अनावश्यक संपर्क टाळावा, घरातील वयोवृद्ध आणि लहान मुलांची काळजी घ्यावी, श्रावण महिना सणवारांचा महिना असला तरी सध्याच्या परिस्थितीत स्वतःच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्यावे. सणवार साधेपणाने आणि आपापल्या घरातच साजरे करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post