लोक कोरोनाने नव्हे भीतीने मरत आहेत; लॉकडाऊन काळाची गरज : श्रीनिवास बोजा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : सध्या अहमदनगर शहर व उपनगरांमध्ये कोरोनाच्या त्रासामुळे नव्हे तर कोरोनाच्या भीतीने लोक मरत असल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक भयभीत झाले असून, आता नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना करावी, शहर लॉकडाऊन करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना केली आहे.

मनपा प्रशासनाने त्यांच्या परीने उपाययोजना करत आहेत. परंतु सदर उपाय योजना तोकडी पडत असल्याचे दिसून येत आहे. खाजगीमध्ये अधिकारी व कर्मचारी ही सदरची बाब निदर्शनास आणून देत आहेत. संपूर्ण नगर शहर व उपनगर अनलॉक झाल्यामुळे नागरिक बेजबाबदारपणे वागत असल्याचे दिसून येत आहे. कोणीही सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत नाही. प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे वागत नाहीत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजार व इतर बाजारांमध्ये पूर्वीप्रमाणेच गर्दी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे फेसबुक, व्हाट्सअपद्वारे कोरोना बाबत चुकीची माहिती पोस्ट करून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. या भीतीमुळे काही लोक मयत झाल्याचे चित्र आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण नगर शहर व उपनगर लॉकडाउन करणे गरजेचे आहे.

यापुढे लॉकडाऊन करीत असताना प्रशासनाने जो भाग दुर्गम आहे, हातावर काम करून पोट भरणारे रोजंदारी कष्टकरी जनसमुदाय आहे, अशा भागांमध्ये कम्युनिटी किचनची निर्मिती करावी. जेणेकरून नागरिकांचे खाण्यापिण्याचे हाल होणार नाहीत. तसेच त्या भागामध्ये त्यांच्या आरोग्याचा विचार करून  प्रथमोपचार व्यवस्था या काळामध्ये करावी, अशी मागणी बोज्जा यांनी केली आहे.

नुकततेच लोकसेवक सुद्धा सध्याच्या परिस्थितीची जबाबदारी घेत नसून प्रशासनावर ढकलत आहेत. ही बाब खेदाची असून प्रशासनाने ही वेळ लोकसेवकावर का आली, याचा गांभीर्याने विचार करावा. लॉकडाऊन न करता जर कोरोना प्रादुर्भाव कमी होणार असेल, तर निश्चितच लॉकडाऊन करू नये. परंतु जर दिवसेंदिवस रुग्ण संख्येत अनाकलनीय वाढ होत असेल, तर ही बाब गंभीर आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात एक हजारा पेक्षा जास्त पॉझिटिव्ह पेशंट आढळल्याचे निष्पन्न झाले आहे. याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असे श्रीनिवास बोज्जा यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post