अहमदनगर : मनपा स्थायी समिती निवडीसाठी रंगणार चुरस


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : मागील सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त आठ जागांची निवड आता होऊ घातली आहे. सुरुवातीला नवे सदस्य नियुक्ती व लगेच नवा सभापती निवड या मुद्यावर सत्ताधारी भाजपसह मित्रपक्ष राष्ट्रवादीतील काहीजण आक्रमक असल्याने त्यांना थंडावा मिळावा म्हणून रिक्त जागांची निवड टाळली गेली व त्यानंतर कोरोना विषय सुरू झाल्यावर आयतेच कारण मिळून रिक्त जागांची निवड लांबणीवर पडली. पण आता या जागांची नियुक्ती येत्या ३० जुलै रोजी होणाऱ्या मनपाच्या ऑनलाइन महासभेत महापौर बाबासाहेब वाकळे करणार आहेत. अर्थात रिक्त जागांवर त्या-त्या पक्षांच्या गटनेत्यांनी सुचवलेली नावे महापौर जाहीर करणार आहेत. ही नावे जाहीर झाल्यानंतर नव्या नियुक्त्या प्रत्यक्षात येणार आहेत. त्या आल्यानंतर नव्या सभापतीची निवड ऐरणीवर येते की नाही, हा महापालिकेत उत्सुकतेचा विषय असणार आहे. मात्र, सहा महिन्यांपासून रखडलेल्या स्थायी समितीच्या रिक्त जागांवर नियुक्त्या होत असल्याने इच्छुकांनी गटनेत्यांकडे फिल्डींग लावणे सुरू केले आहे.

डिसेंबर २०१८मध्ये मनपाची चौथी सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर पहिली स्थायी समिती जानेवारी २०१९मध्ये अस्तित्वात आली. एक वर्ष पूर्ण झाल्यावर चिठ्ठ्या काढून ८ सदस्य ३१ जानेवारी २०२० रोजी निवृत्त झाले. यात शिवसेनेचे गणेश कवडे, विद्या खैरे व अमोल येवले, राष्ट्रवादीचे अविनाश घुले, दीपाली बारस्कर व शोभा बोरकर, काँग्रेसच्या संध्या पवार व भाजपचे मनोज कोतकर या नगरसेवकांचा समावेश होता. यात सेनेचे व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ३ तसेच काँग्रेस व भाजपचा प्रत्येकी एक नगरसेवक होता. त्यांच्या या रिक्त जागी अशाच पक्षीय सदस्य संख्येनुसार नवे सदस्य नियुक्त होणार होते. पण फेब्रुवारी महिन्यात प्रभाग ६ अ या जागेच्या पोटनिवडणुकीत सेना उमेदवाराचा पराभव होऊन भाजपच्या पल्लवी जाधव विजयी झाल्याने मनपातील पक्षीय बलाबल बदलले व सेनेची २४ नगरसेवकांची संख्या एक जागा कमी झाल्याने २३ झाली व भाजपची १४ नगरसेवकांची संख्या एकने वाढून १५ झाली. स्थायी समितीत सेनेचे संख्याबळही एकही कमी होऊन ते सहावरून पाचवर आले. तर भाजपचे ३ वरून एकने वाढून ४ झाले. परिणामी रिक्त झालेल्या जागांमधील सेनेची एक जागा कमी होऊन भाजपची एक वाढली आहे. त्यामुळे आता रिक्त ८ जागांमध्ये राष्ट्रवादीचे ३, सेना व भाजपचे प्रत्येकी २ व काँग्रेसचा एक सदस्य नियुक्त होणार आहे.

सेना व भाजपमध्ये वादाची शक्यता
स्थायी समितीच्या रिक्त जागांवर नव्या सदस्याची नियुक्ती संबंधित पक्षाच्या गटनेत्याच्या शिफारशीवरून होत असते. त्यामुळे राष्ट्रवादीचे गटनेते व मनपातील विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर, भाजपच्या गटनेत्या व उपमहापौर मालनताई ढोणे, शिवसेनेच्या गटनेत्या रोहिणी शेंडगे व काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव यांना महत्त्व आले आहे. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांनी या गटनेत्यांकडे संपर्क साधणे सुरू केले आहे. पण यातील भाजप व सेनेच्या गोटात या नियुक्त्यांवरून रस्सीखेच व काहीशी वादावादीचीही शक्यता आहे. कारण, मनपाच्या राजकारणात दलित वस्ती निधीच्या वितरणावरून महापौर वाकळे व उपमहापौर ढोणे यांच्यात वाद आहेत. दलित वस्ती नसलेल्या प्रभागांतून व निवडक व तेही मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागांतून या निधीचे वाटप झाल्याचे व ज्या प्रभागांमध्ये दलित वस्ती आहे, त्या प्रभागांना निधी न देता त्यांच्यावर अन्याय केल्याचे म्हणणे उपमहापौर ढोणे यांचे आहे. हे वाद मिटल्याचे काहीजण सांगतात, पण ते सुरूच असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. त्यामुळे या वादाचे पडसाद स्थायी समितीवर भाजपच्या दोन सदस्य नियुक्तीवर पडण्याची शक्यता आहे. महापौरांनी सुचवलेली नावे उपमहापौर व गटनेत्या स्वीकारतात की नाही व त्या नावांची शिफारस करतात की नाही तसेच प्रत्यक्षात महापौर महासभेत कोणती नावे जाहीर करतात, हे पाहणे आता कुतूहलाचे झाले आहे. अशीच काहीशी स्थिती शिवसेनेतही आहे. तेथेही विधानसभा निवडणुकीपासून दोन गट पडल्याचे सांगितले जाते. माजी आमदार अनिल राठोड यांच्या गटापासून बहुतांश नगरसेवकांनी फारकत घेतल्याचेही बोलले जाते. या पार्श्वभूमीवर सेनेच्या गटनेत्या शेंडगे कोणत्या नगरसेवकांच्या नावांची शिफारस स्थायी समिती सदस्यत्वासाठी करतात व त्या नावांना राठोड समर्थकांची संमती आहे की नाही, यावरून सेनेतील वातावरण आलबेल आहे की नाही, हे स्पष्ट होणार आहे. पण यानिमित्ताने सहा महिन्यांपासून रखडलेल्या स्थायी समिती सदस्य नियुक्त्या आता एकदाच्या होऊ घातल्या असल्याचे समाधान इच्छुक नगरसेवकांमध्ये जास्त आहे. या नियुक्त्या झाल्यानंतरच नव्या सभापती निवडीचे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post